esakal | आता शनिवारीही भरणार पूर्ण दिवस शाळा  
sakal

बोलून बातमी शोधा

saturday will also be full day school in karnataka

आठवड्‌यातील सहा दिवस पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे

आता शनिवारीही भरणार पूर्ण दिवस शाळा  

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : अर्धे शैक्षणिक वर्षे पूर्ण झाले तरी अद्याप शाळांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा लवकरच निर्णय घेतला जाणार असून शाळा सुरु झाल्यानंतर शनिवारीही पूर्ण दिवस शाळा भरविली जाणार आहे. त्यामुळे आठवड्‌यातील सहा दिवस पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे. 

दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस शाळा सुरु होतात. परंतु, यावेळी शाळा सुरु होण्यास मोठा विलंब झाला असून काही राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता कर्नाटकातही शाळा सुरु केल्या जाणार आहेत. याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चा सुरु आहेत. कमी दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असल्याने अभ्यासक्रमात कपात करण्यासह शनिवारीही पूर्ण दिवस शाळा ठेवावी असा विचार शिक्षण खात्याने सुरु केला आहे. शाळा वेळेत सुरु होण्यास अडचण झाल्याने काही दिवसांपूर्वी, अभ्यासक्रमात 30 टक्‍कांची कपात करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला तर मार्च अखेरपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा तसेच महत्वाचा अभ्यासक्रम शिकविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 
शिक्षण खात्याच्या वेळापत्रकाप्रमाणे सोमवार ते शुक्रवार पूर्ण दिवस शाळा तर शनिवारी सकाळच्या सत्रात शाळा घेतली जाते. परंतु येणाऱ्या काळात शनिवारीही पूर्ण दिवस शाळा भरविली जाणार आहे. मात्र शिक्षण खात्याच्या या निर्णयाला पालकांचा विरोध होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यावेळी दिवस भरुन काढण्यासाठी शनिवारी पूर्ण दिवस शाळा घेण्यास विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याने शनिवारी पूर्ण दिवस भरविणे आवश्‍यक असल्याचे मत शिक्षणाधिकाऱ्यांमधून व्यक्‍त होत आहे. 

हे पण वाचामराठमोळ्या बेळगावच्या सुपुत्राचा अमेरिकेत डंका

शाळा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र त्याबाबत विचार सुरु असून शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. शनिवारी पूर्ण दिवस शाळा घेतली तर अभ्यासाचे नियोजन योग्य प्रकारे करण्यास मदत होणार आहे. 

-ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी 


 शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्‍यक असून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवारी शाळा भरविण्याचा निर्णय चांगला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अधिक वेळ मिळेल.
-अनिल पाटील, पालक 


संपादन - धनाजी सुर्वे 

go to top