संविधान बचाओ, देश बचाओ !'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : रखरखत्या उन्हात हातात तिरंगा, डोक्‍यावर भगवे फेटे आणि नागरी दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे फलक हातात घेऊन आज ऐतिहासिक दसरा चौकात "संविधान बचाओ'चा नारा घुमला. "सीएए', "एनपीआर' आणि "एनआरसी'ला विरोधासाठी लाखो नागरिकांनी आज "संविधान बचाव' मोर्चात सहभाग घेतला. तब्बल हजार फुटांहून मोठा असलेला तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या इचलकरंजी परिसरातील नागरिकांनी मोर्चाची भव्यता वाढवली.

कोल्हापूर : रखरखत्या उन्हात हातात तिरंगा, डोक्‍यावर भगवे फेटे आणि नागरी दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे फलक हातात घेऊन आज ऐतिहासिक दसरा चौकात "संविधान बचाओ'चा नारा घुमला. "सीएए', "एनपीआर' आणि "एनआरसी'ला विरोधासाठी लाखो नागरिकांनी आज "संविधान बचाव' मोर्चात सहभाग घेतला. तब्बल हजार फुटांहून मोठा असलेला तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या इचलकरंजी परिसरातील नागरिकांनी मोर्चाची भव्यता वाढवली.

"संविधान बचाव' मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन आज दसरा चौकासह जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दिसून आले. सकाळी नऊपासूनच दसरा चौकात नागरिक जमा झाले. अनेक तरुण, हिंदू-मुस्लिम महिलांच्या डोक्‍यावर भगवा फेटा असल्याने दसरा चौकात भगवे वादळ दिसत होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर उभारलेल्या व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली.
साडेअकराच्या सुमारास दसरा चौकात जाणारी सर्व वाहने व्हिनस कॉर्नरपासून बंद केली होती. हजारोंच्या जत्थ्यांनी नागरिक मोर्चासाठी येत होते.

मुस्लिम महिलांनीही डोक्‍यावर भगवे फेटे बांधून हातात तिरंगा घेऊन दसरा चौकात हजेरी लावली होती. काही महिला भगव्या साड्या परिधान करून, डोक्‍यावर भगवे फेटे बांधून, हातात तिरंगा घेऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोतिबा फुले यांची छायाचित्रे घेऊन दसरा चौकात दाखल होत होत्या. मोर्चातील अनेकांनी डोक्‍यावर भगव्या टोप्या घातल्या होत्या. त्यावर "देश बचाओ'चा संदेश दिला होता. दसरा चौकातील व्यासपीठावरून सुरू असलेल्या भाषणाला टाळ्यांनी आणि घोषणांनी दाद दिली. उन्हात तापलेल्या रस्त्यावर नागरिक बसून होते.

ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी मोर्चासमोर भाषण केल्यानंतर टाळ्यांचा कटकडाट झाला. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास श्रीमंत शाहू महाराजांनी प्रमुख भाषण केले. त्यानंतर महापौर निलोफर आजरेकर यांचे भाषण सुरू असतानाच विराट मोर्चात खानविलकर पेट्रोलपंपाकडून हजारो नागरिक "आझादी दो', "संविधान बचाओ' यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करीत मोर्चात सहभागी होऊ लागले. त्यांच्याकडे असलेला सुमारे हजार फुटांपेक्षा मोठा तिरंगा घेऊन ते मोर्चाच्या मुख्य ठिकाणी सहभागी झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील मैदानावर वाहने लावून नागरिक चालत दसरा चौकात आले. शहरातील मुख्य रस्त्यावर जिकडे-तिकडे मोर्चाच मोर्चा दिसत होता. दसरा चौकात व्यासपीठावरील महापौर आजरेकर यांचे भाषण संपल्यानंतर मोर्चा दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात आला.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. हे निवेदन तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली. येथे माजी महापौर आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक करून मोर्चाची माहिती दिली. यानंतर सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, वसंत मुळीक, सुभाष देसाई, व्यंकाप्पा भोसले, ऍड. गुलाबराव घोरपडे, कादरभाई मलबारी, संदीप देसाई, डॉ. अमृता पाठक यांनी मागण्यांबाबतची माहिती दिली. श्रीमंत शाहू महाराजांनी जनतेची भूमिका मांडली; तर महापौर निलोफर आजरेकर यांनी कोल्हापुरातील आदर्श देशभर पोचविण्यासाठी हे निवेदन तातडीने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पाठविण्याची विनंती जिल्हाधिकारी देसाई यांना केली.

या वेळी उपमहापौर संजय मोहिते, भरत रसाळे, अशोक भंडारी, अनिल कदम, माणिक मंडलिक, संभाजीराव जगदाळे, ऍड. अशोक साळोखे, बाबा पार्टे, स्वप्नील पार्टे, अतुल दिघे, व्ही. बी. पाटील, गणी आजरेकर, रवींद्र मोरे, सुलोचना नाईकवडे, सरला पाटील, बबन रानगे, अनिल म्हमाणे, संदीप देसाई, एस. के. माळी आदी उपस्थित होते.

निवेदनातील मागण्या अशा ः
*सीएए कायदा रद्द करावा, मागे घ्यावा
*एनआरसीची प्रक्रिया लागू करणार नाही, असे संसदेत जनतेला वचन द्यावे
*एनपीआरची प्रक्रिया राबविताना 2010च्या मुद्दापेक्षा वाढीव मुद्दे वगळावेत
*फॉरेनल ट्रिब्युनल कोर्ट, डिटेंशन सेंटर यांचे धोरण रद्द करावे
*परकीय निर्वासित नागरिकांना मानवतेच्या भूमिकेतून पाहावे
*निर्वासित नागरिकांशी आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अखत्यारित व्यवहार करावा
*एनआरसीसाठी नागरिकत्व कायद्यात जे बदल केले, तेही रद्द करावेत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save the constitution, save the country! '