गतवर्षी महापुर, या वर्षी कोरोना आणि आता लोकरी माव्याचे संकट... 'या' तालुक्यातील शतेकरी हतबल

गणेश शिंदे
Saturday, 25 July 2020

गतवर्षी महापुराने नदीकाठच्या गावातील ऊस शेतीचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याचा प्रयत्न केला असला तरी नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

जयसिंगपूर : गतवर्षी महापुराने उसाचे मोठे नुकसान झाले. या वर्षी कोरोनामुळे खतांचा टंचाई जाणवली असताना पुन्हा महापुराचीही धास्ती नदीकाठच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. अशा स्थितीत शिरोळ तालुक्‍यातील उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमागील समस्यांची मालिका संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. कृषी विभागाने याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

गतवर्षी महापुराने नदीकाठच्या गावातील ऊस शेतीचे कोट्यवधींचे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याचा प्रयत्न केला असला तरी नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शेती उत्पादनाचा वाढलेला खर्च, जवळपास दीड वर्ष शेतात उसाची घ्यावी लागणारी काळजी आणि त्या तुलनेत मिळणाऱ्या दराचा विचार करता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शिरोळ तालुक्‍यात तांबेऱ्यानंतर चार-पाच वर्षापासून गायब झालेला लोकरी मावा पुन्हा उसावर दिसू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन जुलैमध्ये शेतकऱ्यांना उसाला पाणी देण्याची वेळ आली आहे. दरवर्षी पाऊस जादा झाल्याने आनंदीत असणाऱ्या शेतकऱ्यांवर सरी धरुन पाणी देण्याची वेळ आली आहे. तालुका कृषी विभागाने लोकरी माव्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. 

मित्र किडीने प्रादुर्भाव कमी
शिरोळ तालुक्‍यातील लोकरी माव्याच्या प्रादुर्भावाची माहिती घेत आहे. औषध फवारणीसह मित्र किडीच्या वापराने लोकरी माव्याचा प्रादुर्भाव कमी करणे शक्‍य आहे. तालुक्‍यातील ऊस क्षेत्रातील लोकरी माव्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना उपाययोजनांची माहिती देऊ. 
- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी, शिरोळ 

औषध फवारणी परिणामकारक नाही
उसाला किमान 18 ते 20 कांड्या झाल्या आहेत. त्यामुळे औषध फवारणी करणे फारसे परिणामकारक ठरत नाही. मित्र किडीचा यासाठी चांगला वापर होऊ शकतो. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील चंदूर, चंदूरटेक, इंगळी आदी भागात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आहे. आता शिरोळ तालुक्‍यातही तो दिसत आहे. 
- सागर कोरे, कृषी सल्लागार 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shirol Taluka Lokri Mawa On Sugarcane Kolhapur Marathi News