The shooting of the series is now in Kolhapur
The shooting of the series is now in Kolhapur

लई भारी ! मालिकांचे शूटिंग आता कोल्हापुरात... 'सकाळ' ने घेतला पुढाकार...

कोल्हापूर  - लॉकडाउनच्या काळात एकूणच मनोरंजन क्षेत्राची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी कोल्हापुरातील कलाकार, तंत्रज्ञांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाठबळ दिले असून याबाबत 'सकाळ'च्या माध्यमातून सर्व संबंधित घटकांशी झूम मीटिंग ऍपच्या माध्यमातून चर्चा झाली.

लॉकडाउननंतर लवकरात लवकर कोल्हापुरात शूटिंग सुरू करणे, नवीन मालिकांचे प्रोजेक्‍ट कोल्हापुरात आणणे, सध्या बंद असलेल्या मालिकांचे शूटिंग कोल्हापुरात आणणे आणि त्यासाठी आवश्‍यक नियमावलीसह शासनाच्या माध्यमातून कोणत्या सवलती देता येतील, आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. 

राज्याचे गृह राज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील, अभिनेता सुबोध भावे, अभिनेता व निर्माता भरत जाधव, दिग्दर्शक रवी जाधव, गायक व संगीतकार अवधूत गुप्ते, अभिनेता विजय पाटकर, कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रॅमिंग हेड दीपक राजाध्यक्ष, सोनी मराठी वाहिनीचे अमित फाळके, निर्मात्या स्मृती शिंदे, निर्माते नितीन वैद्य, निर्माते सुनील भोसले, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, 'फिक्की'चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ललित गांधी, चित्रपट महामंडळाचे संचालक सतीश रणदिवे, अभिनेता आनंद काळे, स्वप्नील राजशेखर, दिग्दर्शक अजय कुरणे, मिलिंद अष्टेकर, मयूर रानडे, अष्टविनायक मीडिया व एंटरटेन्मेंटचे संग्राम पाटील, अश्‍विन सावनूर, 'प्रीमियर'चे संपादक (एंटरटेन्मेंट) संतोष भिंगार्डे आदी चर्चेत सहभागी झाले. 

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सहकार्य

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, "लॉकडाउनच्या काळात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला. मनोरंजन क्षेत्रही त्याला अपवाद नसून आता लवकरात लवकर शूटिंग सुरू व्हावी लागतील आणि त्यासाठी कोल्हापूर हा चांगला पर्याय असून त्यादृष्टीने आवश्‍यक प्रयत्न सुरू झाले आहेत. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.'' 

दरम्यान, 'सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांनी स्वागत केले. 

चर्चेतील काही प्रमुख मुद्दे 

  • मालिकांच्या शूटिंगला प्राधान्य देणे आणि त्यासाठी नवीन प्रोजेक्‍टवर अधिक भर देणे 
  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक नियमावली आणि शक्‍य तितक्‍या सर्व सवलती शासनाकडूनच मिळवणे 
  • युनिटमध्ये मुंबई किंवा पुण्यातून केवळ 20 टक्के कलाकार व तंत्रज्ञ येतील. त्यांच्या योग्य त्या सर्व तपासण्या 24 तासात पूर्ण केल्या जातील. त्यानंतरच शूटिंगला प्रारंभ होईल. 
  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शूटिंगची लोकेशन्स व निवास व्यवस्था असणारे हॉटेल इतकाच प्रवास कलाकार व तंत्रज्ञ मंडळी करतील 
  • कोल्हापूर चित्रनगरीत तत्काळ आणखी काही लोकेशन्स उपलब्ध करण्यावर भर देणे 

कोल्हापूर काय देणार ? 

प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य, एकाच वेळी आवश्‍यक सर्व परवानग्या, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी, चित्रनगरीसह आवश्‍यक शंभरहून अधिक लोकेशन्स आणि सर्व इतर सुविधा माफक शुल्कात उपलब्ध करून देणार, आवश्‍यकतेनुसार अनुभवी कलाकार व तंत्रज्ञांची टीम, मालिकांच्या एपिसोड अपलोडिंगसाठी आवश्‍यक अत्याधुनिक तांत्रिक सुविधा. 

कोल्हापूर शूटिंग डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार होत असून सध्या संकटात असलेल्या इंडस्ट्रीला मदतीसाठी कोल्हापूरने पुढाकार घेतला आहे. विविध प्रोजेक्‍ट कोल्हापुरात यायला तयार असून त्यासाठी आवश्‍यक सकारात्मक बोलणीही झाली आहेत. तिसरा लॉकडाउन संपताच शूटिंग सुरू केली जातील. त्यासाठी केवळ जिल्हा प्रशासनच नव्हे, तर राज्य शासनाच्या माध्यमातून शक्‍य ती सर्व मदत व सवलती निर्माते व निर्मिती संस्थांना दिल्या जाणार आहेत. 

कोल्हापूर व 'सकाळ'चा पुढाकार 

लॉकडाउननंतर एकूणच इंडस्ट्री सुरळीत होण्यासाठी कोल्हापूरने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू झाली आणि आता काही बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र, आजच्या चर्चेच्या निमित्ताने सर्व संबंधित घटक एकाच प्लॅटफॉर्मवर आले आणि हा संवाद अधिक सकारात्मक पद्धतीने पुढे गेला. त्यासाठी 'सकाळ'ने पुढाकार घेतल्याबद्दल सर्वांनी 'सकाळ'चे अभिनंदन केले. 


 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com