इचलकरंजी पालिका राजकारणात पुन्हा बदलाचे संकेत 

पंडित कोंडेकर
Saturday, 28 November 2020

येत्या महिन्याभराच्या कालावधीनंतर येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या नूतन सभापती पदाच्या निवडी होणार आहेत.

इचलकरंजी : येत्या महिन्याभराच्या कालावधीनंतर येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या नूतन सभापती पदाच्या निवडी होणार आहेत. या निमित्ताने पून्हा एकदा पालिकेच्या राजकारणात मोठ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सत्तेच कोण येणार व सत्तेतून कोण पायउतार होणार, याची चर्चा आतापासूनच रंगत आहे. 

पालिकेत सद्या माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप, कॉंग्रेसमधील आवाडे गट आणि राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी सत्तेत आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर सलग तीन वर्षे भाजप, राष्ट्रवादीतील जांभळे गट आणि सागर चाळके यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडी सत्तेत होते. मात्र गेल्या नूतन सभापती पदाच्या निवडीवेळी मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. ताराराणी आघाडी आणि राष्ट्रवादीतील जांभळे गट सत्तेबाहेर राहिला. तर विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसमधील आवाडे गट व राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी हे सत्तेत सहभाग झाले. 

दरम्यान, गेली वर्षभर सत्ताधारी पक्ष कधीच एकसंध दिसला नाही. सातत्यांने कुरबुरी दिसून आल्या. त्याचा फायदा विरोधकांनी अनेकवेळा घेतला. सभेच्या कामकाजावेळी अल्पमतात येण्याची नामुष्की सत्तारुढ गटावर अनेकवेळा आली होती. यातील एक गटाची भूमिका नेहमी सभागृहाबाहेर वेगळी आणि सभागृहात वेगळी राहिली आहे. यामुळे पालिका कामकाजात अनेकवेळा सत्तारुढ गटापेक्षा विरोधकांचा प्रभाव अधिक जाणवत राहिला. मुळात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे गेल्या वर्षभरात विद्यमान सभापतींना प्रभावीपणे कामच करता आले नाही. अनेक कामे निधी अभावी रखडली आहेत. त्यामुळे संधी मिळूनही अपेक्षीत काम न करता आल्याची खंत विद्यमान सभापतींना आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विविध विषय समित्यांच्या नूतन सभापती पदाच्या निवडी होणार आहेत. या सभागृहातील या शेवटच्या निवडी आहेत. त्यामुळे या निवडींना विषेश महत्व असणार आहे. या निमित्ताने मोठ्या घडामोडीचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. सत्तेत कोण परतणार व सत्तेतून कोण पायऊतार होणार याची चर्चा रंगली आहे.

सद्या होत असलेली चर्चा पाहिल्यास सत्तेतील एका गटाला बाहेरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्‍यता अधिक आहे. त्याऐवजी विरोधातील एक गट सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबतची व्यूहरचना आतापासूनच सुरू आहे. मात्र या सर्व घडामोडी ऐनवेळी होण्याच्या शक्‍यता आहे. 

नेतृत्वाचा कस लागणार 
विद्यमान सभागृहातील नूतन सभापती पदाच्या या शेवटच्या निवडी आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी नक्की संधी देण्यात येईल, असा शब्द आता देता येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर या निवडीवेळी सत्ताधारी गटातील नेतृत्वाचा कस लागणार आहे. 

विद्यमान विषय समित्यांचे वाटप असे 
- बांधकाम - आवाडे गट (कॉंग्रेस) 
- शिक्षण - आवाडे गट (कॉंग्रेस) 
- पाणी पुरवठा - शाहू आघाडी 
- महिला व बालकल्याण -शाहू आघाडी 
- उपनगराध्यक्ष - भाजप 
- आरोग्य - भाजप 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signs Of Change In Ichalkaranji Municipal Politics Again Kolhapur Marathi News