रत्नागिरी एसटी विभागाचे 6 कर्मचारी मुंबईकरांच्या सेवेत....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

अत्यावश्यक कर्मचार्‍यांची ने-आण...

रत्नागिरी - टाळेबंदीच्या काळात मुंबईकरांच्या सेवेत एसटी महामंडळाचे 86 चालक, वाहक दाखल झाले आहेत. अत्यावश्यक सेवेत असणार्‍या कर्मचार्‍यांना नेण्या-आणण्याची जबाबदारी एसटीवर आहे. या सेवेत रत्नागिरी जिल्ह्यातील 6 कर्मचारी असून सेवा देत आहेत. कोरोनाशी (कोविड-19) लढा लढताना या कर्मचार्‍यांचे योगदानही महत्त्वाचे आहे.

24 मार्चच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी सुरू झाली. तत्पूर्वी एक आठवड्यापासून एसटीची सेवा विस्कळित झाली. त्यामुळे सध्या महांमडळ मोठ्या संकटातून जात आहे. अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा असली तरी कोरोनामुळे एसटी महामंडळ पूर्ण बंद होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांची टाळेबंदी जाहीर केली. मुंबईत रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वतःची सर्व वाहने बंद ठेवल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना सुखरूप नेण्या-आणण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर दिली. याकरिता मुंबई, ठाणे, पालघर विभागामार्फत विशेष वाहतुकीचे आदेश दिले होते. परंतु टाळेबंदीमुळे या तिन्ही विभागाचे कर्मचारी गावाला निघून गेल्याने महामंडळाने सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक विभागातील चालक, वाहकांना पाचारण केले. रायगड 20, सातारा 16, रत्नागिरी 6, सोलापूर 23 आणि नाशिक विभाग 21, असे एकूण 86 एसटीचे वाहक आणि चालक सेवा देत आहेत.

हे आहेत कर्मचारी

राजापूर आगारातील चालक तथा वाहक दत्तात्रय दादाराव पांचारे, सिद्धार्थ अरुण लांडगे आणि चालक सचिन रामराव वळगे, दापोली आगारातील चालक यु. पी. टापरे, ए. एच. पाटील आणि गुहागर आगारातील चालक तथा वाहक प्रवीण संतोष जाधव यांचा समावेश आहे. हे कर्मचारी वसई, विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल, वाशी, मुंबई या महापालिकेच्या कार्यक्षेत्रात शहरी वाहतूक करत आहेत. या कर्मचार्‍यांचे रत्नागिरी एसटी विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six employees of Ratnagiri ST department serve Mumbai