बाप रे ः महिनाभर सहाजण एका खोलीतील बंदिस्त

बाप रे ः महिनाभर सहाजण एका खोलीतील बंदिस्त

चंदगड ः मुंबईत 10 बाय 12 ची खोली, एक महिन्यापासून 24 तास सहा जणांचा वावर. सुरवातीचे काही दिवस खूप गप्पागोष्टी झाल्या, टीव्ही पाहणे झाले. मात्र, आता दररोज बोलायचे तरी काय? टीव्हीवरच्या कोरोनाच्या बातम्यांचा वीट आलाय. पुस्तकात डोके घालायचे म्हटले तर ते हातात धरण्याची इच्छा होत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचाच वावर आम्हाला त्रासदायक ठरू लागलाय. पोईसर (मुंबई) येथे राहणारा मधुकर पोवार उद्विग्नपणे बोलत होता.

मेच्या सुटीत गावाकडे येण्याचे नियोजन लॉकडाउनमुळे फसले. परंतु, क्वारंटाईनमुळे खोलीबाहेर पडण्यास मज्जाव असल्याने त्याच्या स्वभावातील चिडचिड स्पष्टपणे जाणवत होती. 
मे महिना आणि गाव हे मुंबईकरांचे समीकरण आहे. मुलांच्या परीक्षा संपून उन्हाळी सुटी पडलेली असते. शिवाय, मुंबईत उष्णतेचा पारा वाढलेला असतो. त्यामुळे या काळात गावाकडे राहणे सोयीचे ठरते. खरिपाच्या तयारीत गावाकडच्या कुटुंबीयांना मदत करता येते, असे अनेक उद्देश ठेवून मेच्या सुटीचा सदुपयोग केला जातो. लग्न, यात्रा-जत्रा, वास्तुशांती यांसारखे कौटुंबिक नातेसंबंधातील सोहळेही याच काळात उरकले जातात. त्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळींची भेट होते. त्यामुळे वर्षभर कष्ट करणाऱ्या मुंबईकरांना मेमधील सुट्यांची आस लागलेली असते. 
जानेवारीपासूनच त्यांचे नियोजन सुरू असते. परंतु, या वर्षी या सर्व आकांक्षेवर कोरोनाने पाणी टाकले. दीर्घ काळाच्या लॉकडाउनमध्ये अडकलेला मुंबईकर मर्यादित क्षेत्रफळाच्या खोलीत वैतागला आहे. स्थानिक बाजारपेठ, भाजी मंडईतही मनसोक्तपणे फिरता येत नसल्याने गावाकडे येण्याची प्रबळ इच्छा आहे. 

परसदाराची हवा तर घेता येईल! 
गावाकडे क्वारंटाईन झालो तरी किमान परसदाराच्या खुल्या हवेत विसावा घेता येईल, ही त्याची साधी अपेक्षा आहे. त्याचवेळी गावाकडच्या कारभाऱ्यांनी न येण्याची सूचना दिल्याने तो इकडे आड, तिकडे विहीर अशा कात्रीत सापडला आहे. कोरोनाचा प्रभाव नष्ट व्हावा आणि खुलेपणाने संचार करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, ही अपेक्षा ठेवून तो दिवस कंठत आहे. 

`गावाकडे आई, पत्नीसह मुले राहतात. मी मुंबईत नोकरी करतो. मेची सुटी कुटुंबात घालविण्याचे ठरविले होते. परंतु, कोरोनाने सर्व नियोजन नेस्तनाबूत केले.'' 
- मधुकर पोवार, मुंबईस्थित ग्रामस्थ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com