गावागावांत वाढले छोटे-मोठे व्यवसाय

Small And Big Businesses Grew In The Villages Kolhapur Marathi News
Small And Big Businesses Grew In The Villages Kolhapur Marathi News

कोवाड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाउनमध्ये खेड्यातून शहरात गेलेल्या बहुतांश नोकरदारांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. विशेषतः पुणे, मुंबईला गेलेल्या अनेकांनी कोरोनाची धास्ती घेऊन पुन्हा गावचा रस्ता धरला. त्यांनी गावातच छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. यामुळे ग्रामीण भागाच्या व्यवसायीकरणाची चाके गतिमान झाली आहेत. गावागावांतून थाटलेली दुकाने ही त्याची साक्ष देत आहेत. 

ग्रामीण भागातील तरुणांचा लोंढा नोकरीसाठी विशेषतः पुणे, मुंबई यासह मोठ्या शहराकडे असतो. आजही गावातील बहुतांश तरुण नोकरीनिमित्त शहरांतून स्थिरावले आहेत. या वर्षी कोरोनाचे संकट ओढविल्याने सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प झाली. घराबाहेर पडणेही मुश्‍किल झाले. बेताची नोकरी असणाऱ्यांनी गावाची वाट धरली. काहींनी कायमची नोकरी सोडली. मे महिन्यापासून गावी येणाऱ्या नोकरदारांची संख्या वाढत गेली. ऑगस्ट महिन्यानंतर काही जण पुन्हा नोकरीवर रुजू झाले; पण बहुतांश तरुणांनी नोकरी सोडून गावातच राहण्याचा इरादा पक्का केला आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांनी लॉकडाउन काळात गावात छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले.

तात्पुरत्या स्वरुपात सुरू केलेल्या व्यवसायात हळूहळू त्यांनी जम बसविला. यामुळे गेल्या चार महिन्यांपासून ग्रामीण भागात अनेक छोटे छोटे व्यवसाय वाढले आहेत. भाजीपाल्यासाठी बाहेरगावी जावे लागणाऱ्या लोकांना गावातच भाजीपाला मिळू लागला. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला नकळत गती मिळाल्याचे चित्र आहे. बेरोजगारीतून शोधलेल्या पर्यायामुळे चहाच्या टपरीपासून ते भाजीपाला, पापड, लोणची व किराणा दुकानेही थाटली आहेत.

ज्या गावात एकही दुकान नव्हते त्या गावात आता दोन-चार दुकाने उभी राहिली आहेत. यामध्ये फिरत्या विक्रेत्यांची संख्या कमालीची झाली आहे. काहींनी ऑनलाईन सेवा देण्यावर भर दिला. घरपोच माल मिळू लागल्याने ग्राहकांचीही चांगली सोय झाली. व्यवसायातील स्पर्धा टाळण्यासाठी काही विक्रेत्यांनी विक्रीसाठी गावांची विभागणी करून घेतल्याचेही समजते. एकंदरीत लॉकडाउन काळात ग्रामीण व्यवसायीकरणाला गती मिळाली आहे. 

दुकान चांगले सुरू असल्याने समाधान

लॉकडाउनमुळे मुंबईतील नोकरी सोडावी लागली. रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाल्याने गावीच छोटेसे दुकान सुरू केले आहे. दुकान चांगले सुरू असल्याने समाधानी आहे. 
- प्रकाश कुंभार, कोवाड 
 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com