सावगावातील दीपा पाटील साप पकडण्यात तरबेज ; महाविद्यालयीन विद्यार्थिनी बनली सर्पमित्र

अमृत वेताळ
Thursday, 22 October 2020

कोणता सर्प विषारी आहे? कोणता बिनविषारी आहे, त्याबद्दल त्यांनी तिला माहिती करुन दिली.

बेळगाव : वाढत्या शहरीकरणामुळे यापूर्वी कधीही न झालेला मानव-साप संघर्ष तीव्र झाला आहे. म्हणून तर कधी वॉशरूममधून, तर कधी चक्क घरातील विविध भागांतून साप बाहेर पडल्याच्या बातम्या आणि व्हिडिओ वायरल होतात. हे साप जिवंत पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचे जिकिरीचे काम अनेक सर्पमित्र करताहेत.

हेही वाचा -  गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी  : अनुदान बंद -

आपण आजपर्यंत अनेक पुरुष सर्पमित्र पाहिले आहेत, मात्र बेळगावात सावगावमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीही सर्प पकडण्यात तरबेज आहे. त्यामुळे हा कौतुकाचा विषय बनला आहे. दीपा कल्लाप्पा पाटील असे तिचे नाव आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत पुरुष सर्पमित्र आहेत. निर्झरा चिट्टी या एकमेव महिला सर्पमित्र म्हणून सर्वांना परिचित आहेत. पती आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निर्झरा या सर्प पकडण्यात तरबेज झाल्या आहेत. त्यानंतर आता सावगाव येथील दीपा ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी सर्प पकडण्याचे प्रशिक्षण घेत आहे. तिचे मामा अमित पाटील हे गणेशपूर येथील असून तेही सर्पमित्र आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून ते शहर व तालुक्‍यातील मानवी वस्तीत आढळून येणारे साप पकडण्याचे काम करत आहेत. दीपा ही धाडसी स्वभावाची असल्याने तिलाही सर्प पकडण्याचे प्रशिक्षण देण्याचे अमित यांच्या मनात आले. प्रथम त्यांनी आपण पकडलेले सर्प जंगलात सोडण्यापूर्वी दीपाला त्याबद्दलची माहिती दिली. कोणता सर्प विषारी आहे? कोणता बिनविषारी आहे, त्याबद्दल त्यांनी तिला माहिती करुन दिली.

हेही वाचा - शड्डू ठोकणारा लालमातीतला पैलवान राबण्यासाठी काळ्यामातीत -

कोणता सर्प कशा पद्धतीने हाताळावा, याबद्दलही ती मामांकडून सविस्तर माहिती जाणून घेत आहे. सध्या ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, त्याबरोबरच आता ती सर्प पकडण्याचे प्रशिक्षण घेत आहे. मामाच्या मार्गदर्शनाखाली ती गावात सर्प पकडण्याचे धाडस करत आहे. या कामी कुटुंबीयाचेही तिला सहकार्य लाभत आहे.

"मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सर्पमित्र असलेल्या मामा अमित यांनी मला सर्प पकडण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मी सर्प पकडण्याचे धाडस करत आहे."

- दीपा पाटील, सर्पमित्र

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snack friends dipa is a college student in belgaum also she training of that in belgaum