विडी वळणाऱ्या शिवूडकर मावशी महिला अत्याचाराविरोधातील चळवळीत अग्रेसर

अमोल नागराळे
Saturday, 24 October 2020

विडी वळण्यासोबतच चटणी कांडप व्यवसायातून आर्थिक स्थिरता तर आणलीच; पण सामाजिक भानही जपले.

निपाणी : येथील श्रीनगरमधील विडी वळणाऱ्या श्रीमती कल्पना सुभाष शिवूडकर यांनी माणुसकीच्या संस्कारांमुळे संघर्षपूर्ण वाटचालीतून घराला स्थिरता प्राप्त करून संसार रेटत फुलविला. शिवूडकर मावशींनी पतीच्या अकाली निधनानंतर जबाबदारी पेलत दोन मुली आणि मुलाला वाढविले. विडी वळण्यासोबतच चटणी कांडप व्यवसायातून आर्थिक स्थिरता तर आणलीच; पण सामाजिक भानही जपले.

हेही वाचा - प्रवासाला जाताय नो टेंशन ; बॅग घ्या भाड्याने -

लखनापूर माहेर असणाऱ्या शिवूडकर मावशींचा १९७५ मध्ये विवाह झाला. त्यानंतर विडी वळण्याचे काम सुरु केले. कालांतराने पतीला आजार जडल्याने अख्खे घर चिंताग्रस्त बनले. 
उपचारासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर १९९५ मध्ये पतीचे निधन झाल्याने घरची जबाबदारी येऊन पडली. दोन मुली व मुलाच्या संगोपनासह शिक्षणासाठी आर्थिक ओढाताण सुरु झाल्याने चटणी कांडप केंद्र सुरु केले. याच व्यवसायाच्या आधारे मावशींनी मुलींसह मुलाचे लग्न करून संसार फुलविला.

मुलगा नोकरीस असून चटणी कांडप व्यवसाय त्या व सूनबाई चालवितात. त्यांच्या कित्तूर राणी चन्नम्मा स्वसहाय्य संघानेही मोठी प्रगती साधली आहे. प्रा. कांचन बिरनाळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मावशी सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. प्रा. बिरनाळे-पाटील, ऊर्मिला पोवार, राजश्री पोवार यांच्यासह त्या प्रियदर्शिनी फौंडेशन या समाजसेवी संस्थेत कार्यरत आहेत.

पूरग्रस्त आणि आनंदवन येथे कपडे, धान्य वाटप, वृक्षारोपण अशा कार्यात भाग घेतात. महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात मोर्चा, निदर्शने करून आवाज उठविला आहे. संघर्षातून वाटचाल करीत असताना शिवूडकर मावशींनी लोकगीतांचा छंद जोपासला आहे. भजन गायनासह लोकगीतांच्या स्पर्धेत त्यांनी पारितोषिके मिळविली आहेत. 

हेही वाचा - महापारेषणमध्ये मेगाभरती : हजारो तरुणांना नोकरीची संधी -

"आयुष्यात अनेक चढ-उतार आले; मात्र प्रा. कांचन बिरनाळे-पाटील यांच्यासह गल्लीतील महिला व सर्वांच्या सहकार्याने धीर मिळाला. विडी वळण्यासह चटणी कांडपाच्या व्यवसायात स्थिरता लाभल्याने संकटे निभावली गेली. केवळ कुटुंबात न गुंतता जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यात सहभागी होत आहे."

- कल्पना शिवूडकर, निपाणी

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special nav durga story of amol nagrale on kalpana shirodkar for socail work in belgaum