करवीर तालुक्‍यातील 25 गावांची कोरोनाबाबत अशी दक्षता

प्रतिनिधी
Thursday, 21 May 2020

पुणे, मुंबई, गोव्यासह राज्याच्या विविध भागांतून लोक गावाकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे करवीर तालुक्‍यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पश्‍चिम भागात तीन दिवस कडकडीत गावे बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या बंदमधून दूध संकलन, दवाखाने, मेडिकल सेवा, शेतीची कामे यांना वगळण्यात आले आहे.

कसबा बीड  ः करवीर तालुक्‍यात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील 25 गावांत (ता. 22 मे ते24 मे) असे सलग तीन दिवस कडकडीत लॉकडाउन करून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडशेड (ता. करवीर) येथील महालक्ष्मी हॉलमध्ये भागातील सरपंचांची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी सांगरूळचे सरपंच सदाशिव खाडे होते. 
पुणे, मुंबई, गोव्यासह राज्याच्या विविध भागांतून लोक गावाकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे करवीर तालुक्‍यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पश्‍चिम भागात तीन दिवस कडकडीत गावे बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या बंदमधून दूध संकलन, दवाखाने, मेडिकल सेवा, शेतीची कामे यांना वगळण्यात आले आहे.  करवीर पश्‍चिम भागात किराणा माल दुकाने, बॅंका, व्यापारी बाजारपेठा तीन दिवस कडकडीत बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्राथमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. प्रत्येक गावातील नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात येणार आहे. तसेच क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष देण्यात येईल. 
बैठकीस करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच सत्यजित पाटील (कसबा बीड), दादासाहेब लाड (गणेशवाडी), कुंडलिक कारंडे (सावर्डे दुमाला), मच्छिंद्र कांबळे (शिरोली दुमाला), रवींद्र वेदांते (कोगे), सदाशिव बाटे (बोलोली), दीपाली गुरव (खाटांगळे), मोहन पाटील (सोनाळी) आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिनकर सूर्यवंशी यांनी केले. मच्छिंद्र कांबळे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Such vigilance regarding corona of 25 villages in Karveer taluka