तहसीलदारांवरच 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; एलसीबीकडे तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

लॉकडाउन काळात तालुक्‍यासाठी राज्य शासनाकडून निधी आला होता. त्यातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय करण्याची योजना होती

खानापूर : येथील तहसीलदार रेश्‍मा तालिकोटी यांच्यावर लॉकडाउनच्या काळात 75 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दोडमणी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक (एलसीबी) कडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणीही तक्रारी करण्यात आली आहे. 

लॉकडाउन काळात तालुक्‍यासाठी राज्य शासनाकडून निधी आला होता. त्यातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय करण्याची योजना होती. तहसीलदार कार्यालयाकडून लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात मास्क, सॅनिटायझर आणि थर्मामीटरची खरेदी करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवरही मोठा खर्च करण्यात आल्याची माहिती माहिती आधिकारातून देण्यात आली आहे. मार्च ते मे महिन्यांपर्यंत तालुक्‍यात एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. तरीही बेहिशोबी खर्च करण्यात आल्याचे दोडमणी यांनी म्हटले आहे. मंटपासाठी 17 लाख 89 हजार 180 रुपये, बॅरिकेड्‌ससाठी 1 लाख 19 हजार 600, कर्मचाऱ्यांसाठी जेवण, सॅनिटायझर आणि मास्क खरेदी असा एकूण 75 लाखांचा खर्च करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

हे पण वाचा104 जोडप्यांनी घेतली स्वखर्चातून सप्तपदी 

 

प्रत्यक्षात सॅनिटायझर, मास्क आणि थर्मामीटर खरेदीसाठी कोणत्याही प्रकारच्या निविदा मागविण्यात आल्या नव्हता. हे साहित्य अधिक दराने खरेदी करून त्यात गैरव्यवहार करण्यात आला आहे. तसेच हे साहित्य अथणी येथून खरेदी करण्यात आले असून काही पावत्यांवर तारखाही नाहीत. खोट्या पावत्यांचा वापर करण्यात आला असल्याचे श्री. दोडमणी यांनी तक्रारीत म्हटले आहे. यापूर्वीही काही संघटनांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन लक्ष वेधून घेण्यात आले होते. मात्र त्यानंतरही काहीच कार्यवाही झाली नसल्याने श्री. दोडमणी यांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली आहे. याचा पारदर्शक तपास करुन संबंधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar accused of misappropriation of Rs 75 lakh