
यासंबंधीची फिर्याद रावसाहेब लोखंडे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली
उजळाईवाडी - नेर्ली (ता.करवीर) येथील गुंडू पाटील माळ येथे राहणाऱ्या रावसाहेब रामा लोखंडे यांच्या बंद असलेल्या राहत्या घरात घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून दोन लाख पन्नास हजार रुपये रोख व सोन्याचे नेकलेस व सोन्याची रिंग असा सुमारे 2 लाख 91 हजार 250 रुपयांची चोरी झाली.
यासंबंधीची फिर्याद रावसाहेब लोखंडे यांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली. याविषयी अधिक माहिती अशी, रावसाहेब लोखंडे हे दिवाळी सणानिमित्त रविवार (ता.15) रोजी आपल्या नातलगांकडे घराला कुलूप लावून गेले होते. सोमवारी (ता.16) सकाळी साडेसात वाजता गावाहून परत आल्यानंतर कुलूप व कडी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरवाजा उघडून घरामध्ये पाहता हॉल, बेडरूम व किचनमध्ये सर्वत्र चटणी विस्कटलेली आढळली व बेडरूममधील तिजोरीतील रोख दोन लाख पन्नास हजार व अठरा हजार सातशे रुपयांचे सव्वा तोळ्याचे नेकलेस व बावीस हजार पाचशे रुपयांचे दीड तोळ्यांचे तीन रिंग जोड यांची चोरी झाल्याचे आढळले. याबाबत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इद्रे करीत आहेत.
संपादन - धनाजी सुर्वे