
चंदगड ः गतवर्षी महापुराने घटप्रभा आणि ताम्रपर्णी नदीकाठच्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला असून गतवर्षीच्या नुकसानीपोटी 29 हजार 20 शेतकऱ्यांना 11 कोटी 34 लाख 85 हजार 117 रुपयांचे तर 2018 मधील 5 हजार 982 शेतकऱ्यांचे कोटी 11 लाख 82 हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. 2019 मधील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी 155 शेतकऱ्यांना 3 लाख 88 हजार रुपये मंजूर झाले आहेत. दरम्यान, गतवर्षीच्या नुकसानीपोटी कोवाड, कुदनूर, होसूर, कागणी, तळगुळी, हुंदळेवाडी, कीटवाड, कालकुंद्री या सात गावांना निधीच उपलब्ध झालेला नाही. या गावांना नुकसानीचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यांच्यासाठी 67 लाख 27 हजार 224 रुपयांचा निधी गरजेचा आहे. महसूल विभागाने 15 फेब्रूवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी मागणी केली आहे.
नुकसानग्रस्तांच्या यादीत नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांची नावेच नसल्याने येथील तालुका कृषी कार्यालयात यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
सन 2018 मध्ये जून व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी सुमारे सहा हजार शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. गतवर्षीच्या अतिवृष्टी आणि महापुराने तर शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सलग दहा नदीकाठची पिके पुराच्या पाण्याखाली होती. भात, भुईमूग, नाचणा यासह उसासारखी नगदी पिके कुजून गेली. त्यानंतर ही शेती पडीक अवस्थेतच राहिल्याने येणाऱ्या हंगामाबाबत शेतकऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह आहे.
अशातच शासनाकडून भरपाईचा निधी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याने नाराजीची भावनासुध्दा आहे. तालुका कृषी खात्याकडे गाव निहाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी उपलब्ध असून आपल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. यादीत नाव नसलेले शेतकरी उद्वीग्न झाले आहेत. गतवर्षीच्या अतिवृष्टीचा फटका सर्वच गावांना बसला आहे. तालुक्यातील दिडशे गावात प्रत्येकी किमान एक, दोन शेतकरी गृहीत धरल्यास वंचित शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. यासंदर्भात शासनाने योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे.
भरपाई मिळालेली नाही
अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे शेतात जाऊन करण्याऐवजी एकाच ठिकाणी बसून केले आहेत. तलाठ्यांना विनंती करूनही ते शेताकडे आले नाहीत. नुकसान होऊनही आम्हाला भरपाई मिळालेली नाही. याबाबत निर्णय व्हायला हवा.
सोमनाथ चौगुले, शेतकरी, भोगोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.