सनईचे सुर गुंजणारा परिसर सुना...सुना...

सुनील कोंडुसकर
Wednesday, 17 June 2020

चंदगडपासून दहा किलो मीटरवर वसलेली श्रीपादवाडी ही छोटी वाडी. आंब्या, फणसाच्या गर्द राईत ताम्रपर्णी नदीच्या तीरावर दत्त गिरी महाराजांच्या पादुका आणि दत्त मंदिर आहे.

चंदगड : श्री क्षेत्र श्रीपादवाडी (ता. चंदगड) ही दत्त भक्त दत्तगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी. ताम्रपर्णी नदीच्या तीरावर निसर्गरम्य वातावरणात विसावलेल्या या तीर्थक्षेत्री दरवर्षी शेकडो लग्न कार्य पार पडत असत. या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लॉक डाऊन जाहिर केल्याने लग्न विधी झाले नाहीत.

दरवर्षी सनईचे सुर, वधु-वरांकडील मंडळींची लगबग, स्वादीष्ट जेवणावळींनी गजबजणारा हा परीसर या वर्षी मात्र सुना-सुनाच राहिला. चंदगडपासून दहा किलो मीटरवर वसलेली श्रीपादवाडी ही छोटी वाडी. आंब्या, फणसाच्या गर्द राईत ताम्रपर्णी नदीच्या तीरावर दत्त गिरी महाराजांच्या पादुका आणि दत्त मंदिर आहे. दरवर्षी दत्त जयंतीला इथे मोठा उत्सव होतो. महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण, गोव्यातून हजारो भाविक हजेरी लावतात. त्याशिवाय वर्षभर इथे विविध धार्मिक कार्यासाठी भाविकांची वर्दळ असते. लग्न कार्यासाठी या ठिकाणाला मोठी पसंती आहे.

शहरातील गोंगाटापासून दूर, अध्यात्मिक वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्यात लग्नासारखा सोहळा पार पाडण्याचे समाधान मिळवू पाहणारे अनेकजण या ठिकाणी आपले लग्न कार्य पार पडावे ही इच्छा बाळगून असतात. रमेश सामंत यांनी इथे खास मंगल कार्यालयाची सुविधा उपलब्ध केली आहे. वधु-वरांना जथ्यापासून ते लग्नाचे सर्व विधी आणि उत्कृष्ट पध्दतीचे जेवण माफक किंमतीत उपलब्ध होते.

त्यामुळे गेल्या दहा वर्षात इथे लग्न विधीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यासाठी आधीच नोंदणी केली जाते. या वर्षी कोरोनामुळे शासनाने संचारबंदी लागू केली. लग्नासाठी माफक लोकांच्या उपस्थितीत परवानगी असली तरी परतालुका, जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना वाहतुकीची परवानगी नसल्यामुळे अडचण झाली. नोंदणी केलेले लग्न विधीसुध्दा रद्द झाले. त्यामुळे दरवर्षी लग्न सराईच्या कालावधीत गजबजून जाणारा हा परीसर या वर्षी मात्र सुना-सुनाच आहे. 

कोरोनामुळे मर्यादा
नैसर्गिक आणि अध्यात्मिक ठिकाण म्हणून लोक लग्न कार्याला या जागेची निवड करतात. दरवर्षी शेकडो विवाह होतात. या वर्षी मात्र कोरोनामुळे त्याला मर्यादा आल्या.
- रमेश सामंत, श्रीपादवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is No Wedding Inn In Shri Kshetra Shripadwadi This Year Kolhapur Marathi News