अबब....या 11 लाख लोकांचे होणार आरोग्य सर्व्हेक्षण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

दरम्यान, आयुष समितीच्या बैठकीत या ज्येष्ठ नागरिकांना प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी कोणती औषधे देता येतील व ज्या औषधांना शासनाची मान्यता आहे, अशा औषधाची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ११ लाख ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यामध्ये मधुमेहाचा आजार असलेले व मधुमेहासह इतर आजारांची सर्व माहिती ऍपच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. या ऍपचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

दरम्यान, आयुष समितीच्या बैठकीत या ज्येष्ठ नागरिकांना प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी कोणती औषधे देता येतील व ज्या औषधांना शासनाची मान्यता आहे, अशा औषधाची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा प्रशासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांचे विशेष समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढावी म्हणून आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधेही वितरित करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात आयुष समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये ज्येष्ठांच्या समुपदेशनाचा कृती आराखडा बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना कोणत्या प्रकारची औषधे देता येतील व त्यासाठी लागणारा खर्च याचीही माहिती घेतली जाणार आहे. दोन दिवसांत हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. 

आशा, अंगणवाडी सेविकांची मदत घेणार
जिल्ह्यातील 11 लाख ज्येष्ठ नागरिकांचे आशा व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी ऍपची निर्मिती सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठांची माहिती या ऍपमध्ये एकत्रित केली जाणार आहे. त्यामध्ये संबंधित ज्येष्ठांचे आजार व त्यावरील औषधाची माहिती देण्यात येणार आहे. किमान आठ ते दहा दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These 11 Lakh People Will Have A Health Survey.....Kolhapur Marathi News