उद्या ठरणार इचलकरंजीच्या लॉकडाऊनबाबतची दिशा

वंडित कोंडेकर
रविवार, 12 जुलै 2020

गल्लोगल्ली फिरुन भाजीविक्री करण्याचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करुन दिला आहे. 

इचलकरंजी - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहर 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यापुढे लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की शिथिलता द्यावयची, याबाबतचा निर्णय उद्या (सोमवार) होण्याची शक्यता आहे. दुपारी 12.30 वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सींगव्दारे शहर नियंत्रण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चा करुन लॉकडाऊनबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून शहर नियंत्रण समितीने 14 जुलै पर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात सलग 72 तास लॉकडाऊन झाल्यानंतर पाच तास शिथिलता देण्यात आली होती. भाजापीला व किराणा साहित्य खरेदीसाठी ही सवलत देण्यात आली होती. पण भाजी खरेदीच्यावेळी सोशल डिस्टन्सींग न पाळत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे समुह संसर्गाचा धोका निर्माण झाल्यामुळे मंगळवारी (ता.14) भाजापीला बाजार भरण्यावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले. मात्र गल्लोगल्ली फिरुन भाजीविक्री करण्याचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करुन दिला आहे. 

दुसरीकडे 14 जुलै रोजी लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा पुढील कोणता निर्णय घ्यावयाचा, याबाबत शहर संनियंत्रण समितीची उद्या (सोमवार) दुपारी 12.30 वाजता बैठक होणार आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत सोशल डिस्टन्सींचा फज्जा उडाला होता. शिवाय बैठकीस उपस्थीत असलेल्या दोघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे ही बैठक होणार आहे.
 चर्चेत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, जेष्ठ नगरसेवक सहभागी होणार आहेत. सध्या लॉकडाऊनची मुदत वाढविण्याबाबत मतभेद आहेत.

हे पण वाचा - ब्रेकिंग -कोल्हापुरात दिवसभरात ३७ जणांना कोरोनाची लागण

 विशेष करुन उद्योग क्षेत्रातून लॉक डाऊनला विरोध आहे. अद्यापही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण दररोज आढळून येत आहेत. त्यामुळे आणखी कांही दिवस लॉकडाऊनची मुदत वाढवावी, अशी सर्वसाधारण मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे शंभर टक्के लॉकडाऊन करणार की त्यातून शिथीलता देणार याकडे लक्ष लागले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow will be the direction of Ichalkaranjis lockdown