पारगडवर पर्यटकांची गर्दी वाढली, पण...

सुनील कोंडुसकर
Tuesday, 28 January 2020

तान्हाजी द अनसंग वॉरीयर' हा चित्रपट बॉक्‍स ऑफीसवर गर्दी खेचत आहे. तशीच गर्दी ऐतिहासिक किल्ले पारगडावर होत आहे. तानाजी मालुसुरे यांच्या मुलग्यानंतर पुढच्या पिढ्या याच गडावर वाढल्या. त्यामुळे बेळगाव, गोवा, गडहिंग्लज परीसरातील पर्यटक हा गड बघण्यासाठी गर्दी करत आहेत. ही बाब समाधानाची असली तरी अतिउत्साही पर्यटकांकडून मद्यधुंद अवस्थेत घातला जाणारा धिंगाणा आणि प्लास्टीकचा वापर यामुळे पारगडवासीय त्रस्त झाले आहेत. 

चंदगड :"तान्हाजी द अनसंग वॉरीयर' हा चित्रपट बॉक्‍स ऑफीसवर गर्दी खेचत आहे. तशीच गर्दी ऐतिहासिक किल्ले पारगडावर होत आहे. तानाजी मालुसुरे यांच्या मुलग्यानंतर पुढच्या पिढ्या याच गडावर वाढल्या. त्यामुळे बेळगाव, गोवा, गडहिंग्लज परीसरातील पर्यटक हा गड बघण्यासाठी गर्दी करत आहेत. ही बाब समाधानाची असली तरी अतिउत्साही पर्यटकांकडून मद्यधुंद अवस्थेत घातला जाणारा धिंगाणा आणि प्लास्टीकचा वापर यामुळे पारगडवासीय त्रस्त झाले आहेत. 

गडाच्या पायथ्याशी अपुरी जागा असल्याने वाहनांचे पार्कीग व्यवस्थित करावे लागते. परंतु बेशीस्तपणे पार्कीग करून इतर वाहनांची अडवणुक केली जाते. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे गाड्या लावून पर्यटक रात्री उशीरापर्यंत गडावर धिंगाणा घालत होते. रात्री अकराच्या सुमारास ग्रामस्थांनी त्यांना शांत राहण्याबाबत विनंती केली असता ते त्यांच्याशी हुज्जत घालू लागले.

ग्रामस्थांनी चंदगड पोलिसांना कळवले असता ठाण्याकडे गाडी नसल्यामुळे तिकडे येता येत नसल्याचे सांगून असमर्थता दर्शवली. चंदगडपासून सुमारे चाळीस किलो मीटवर एखादा गंभीर प्रसंग घडला तर ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्‍न विचारला जात आहे. शिवाय हे पर्यटक मद्याच्या बाटल्या आणि प्लास्टीकचा कचरा गडावर इतरस्त पसरून टाकतात. विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संस्था स्वच्छता मोहिम राबवतात. परंतु ज्यांच्याकडून हा कचरा केला जातो ते कर्तव्याचा भागच विसरून जातात.

गडावरील वस्तीचा भाग वगळता संपूर्ण गड वन विभागाच्या अख्त्यारीत आहे. वन विभागाने याबाबत सतर्क रहायला हवे. शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी गडावर पर्यटकांची गर्दी असते त्यावेळी वन विभागाचा कर्मचारी आणि काही पोलिस तैनात केल्यास अतिउत्साही पर्यटकांना आवर घालता येईल. 

वन विभागाकडून स्वच्छता मोहिम.... 
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला गडाची स्वच्छता मोहिम राबवली. यात मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या आणि प्लास्टीक आढळले. वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, वनपाल बी. आर. निकम, वनरक्षक कैलास सानप, शंकर गावडे व सहकाऱ्यांनी यात सहभाग घेतला. यापुढे गडावर आणि वन हद्दीत मद्य किंवा प्लास्टीक आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे राक्षे यांनी सांगितले. 

पावित्र्य जपण्यासाठी ठोस निर्णय घ्यायला हवा
पर्यटकांनी तानाजी मालुसुरेंच्या शौर्याची कथा जाणून गडाला भेट देणे हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे. परंतु छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली ती विसरून मद्य, मांसाच्या आहारी जाऊन धिंगाणा घातला जात असेल, तर ते चुकीचे आहे. वन विभाग आणि पोलिसांनी गडाचे पावित्र्य जपण्यासाठी ठोस निर्णय घ्यायला हवा. 
- कान्होबा माळवे, पारगडवासीय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Tourists At Pargadh Fort-chandagad increased, but... Kolhapur Marathi News