जोतिबा डोंगरावर दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प...

निवास मोटे
शुक्रवार, 20 मार्च 2020

यात्रेत डोंगरावर लाखो रुपयांची उलाढाल होणार होती. ती आता ठप्प झाली असून यंदा जोतिबा डोंगरावर व्यापारी,दुकानदार,ग्रामस्थ पुजारी यांना सुमारे दोन कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.

जोतिबा डोंगर - कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा जोतिबा डोंगरावर जिल्हाधिकाऱ्यानी श्री क्षेत्र जोतिबा डोंगरची चैत्र यात्रा रद्द केली आहे. त्याचा परिणाम म्हणून या यात्रेत डोंगरावर लाखो रुपयांची उलाढाल होणार होती. ती आता ठप्प झाली असून यंदा जोतिबा डोंगरावर व्यापारी,दुकानदार,ग्रामस्थ पुजारी यांना सुमारे दोन कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. दर वर्षी या यात्रेसाठी तीन राज्यरातून  ८ ते ९ लाख भाविक येतात. यंदा ही यात्रा ७ एप्रिलला होणार होती. कामदा एकादशी पासून ही यात्रा सुरु होते. गाव भंडारा होऊन या यात्रेची सांगता होते .

यात्रेसाठी केरळ कर्नाटक तामीळनाडू या राज्यातून ३० नारळाचे ट्रक विक्रीसाठी येतात.सुके खोबरे, खोबरे वाटीचे पाच ट्रक आंध्र प्रदेश केरळ येथून येतात.यात्रेत येणारी गुलालाची २० हजार पोती इस्लामपूर कुंडल सांगली टाकळी पंढरपूर वाई परिसरातून येतात तसेच मेवा मिठाई  शीतपेये, दवणा खेळणी, हॉटेल, यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल दर वर्षी होते.  
यात्रेच्या एक महिना आधीच सर्व व्यापारी दुकानदार नारळ गुलाल खोबरे चिरमुरे मेवा मिठाई या साहीत्यांचा साठा करुन ठेवतात.डोंगरावर काही व्यापारांनी यात्रेत लागणाऱ्या मालाची खरेदी केली आहे . तर काहींनी किरकोळ दुकानदार हात विक्री करणारे यांना देण्यासाठी साठा करुन ठेवला आहे .

या यात्रे साठी बार्शी पंढरपूर या भागातील व्यापारी किरकोळ विक्रेते दर वर्षी येतात . चैत्रात महिनाभर उघड्यावर दुकाने लावून ते व्यापार करतात . यंदा यात्राच भरणार नसल्याने या दुकानदारांवर उपास मारीची वेळ आली आहे .
जोतिबा यात्रेत गुलाब खोबरे उधळण्याची परंपरा आहे . यात्रेत येणारा सर्रास भाविक गुलाल खोबरे विकत घेतो . त्यामुळे गूलाल खोबरे नारळ यांची विक्री यात्रेत मोठ्या जोमाने होते .
गेल्याच आठवडया भरापासून यात्रेला कोरोनाचे सावट लागले .पहिल्यांदा प्रशासनाने मंदिर केले. भाविकांना मंदिर दरवाजातून मुख दर्शनाची सोय केली. आता तर पूर्ण मंदिरच बंद करुन चैत्र यात्रा ही रद्द केली आहे. त्यामुळे सध्या जोतिबा डोंगरावर शुकशुकाट आहे. 
 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंदा जोतिबा यात्रा रद्द झाली . दरवर्षी यात्रेत पंधरा ते वीस हजार चिरमुरे पोत्यांची मागणी डोंगरावर असते . या वर्षी यात्रा बंदमुळे मागणी नाही . त्यामुळे १५ ते २० लाखाचा आर्थिक फटका  यंदा  बसणार आहे .

युवराज लव्हटे , चिरमुरे व्यापारी कोल्हापूर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders shopkeepers and village priests will face a financial loss of about two crore Mount Jotiba