सावत्र आई, वडिलांच्या अत्याचारातून दोन मुलांची सुटका; आठ दिवसांपासून सुरू होता छळ

 तानाजी बिरनाळे
Saturday, 7 November 2020

या मुलांवर आठ दिवसांपासून वडील व सावत्र आईकडून छळ सुरू होता.

कारदगा (बेळगाव) :  सावत्र आई- वडिलांकडून दोन मुलांचा छळ व अत्याचार सुरू होता. त्याची दखल घेत बेळगाव जिल्हा बालकल्याण मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या मुलांची सुटका करून बेळगाव येथील बालसंगोपन केंद्रात पाठविले. ढोणेवाडी  (ता.  निपाणी) येथे ही घटना आज (ता. ७) उघडकीस आली. 

मानसिक  व शारीरिक  छळ करुन बालपण हिरावून घेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, मूळ कारदगा येथील असलेले तानाजी कांबळे कुटुंबीय सध्या ढोणेवाडीतील  लक्ष्मीनगरामध्ये वास्तव्यास आहेत. संस्कार तानाजी कांबळे  (वय  4) व समर्थ तानाजी कांबळे (वय 8)   या दोन कोवळ्या मुलांचा सावत्र आई व तानाजी हा वारंवार छळ करत. दारू पिऊन मारहाण करणे, शारीरिक व मानसिक छळ करणे,  हात व अंगावर भाजणे, अंगाचा चावा घेणे, यासह अनेक अत्याचार करीत होते. याची माहिती काहींनी 'चाइल्ड हेल्पलाईन'ला दिल्यानंतर बेळगाव जिल्हा  बालकल्याण समितीच्या अधिका-यांनी  सदलगा पोलिस ठाण्याच्या सहकार्याने त्या मुलांच्या घरी भेट देवून पाहणी केली.  त्यानंतर मुलांना बालसंगोपन केंद्रांमध्ये पाठविले.
 

याबाबत बालकल्याण मदत केंद्राच्या अधिकारी लिलावती एस. हिरेमठ म्हणाल्या, 'या मुलांवर आठ दिवसांपासून वडील व सावत्र आईकडून छळ सुरू होता. याची कल्पना मिळाल्यानंतर आम्ही सदलगा पोलिस ठाण्याच्या साह्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता मुलांवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. आजी रंजना कांबळे यांच्या सहमतीने मुलांना बेळगावच्या एका सामाजिक संस्थेमध्ये संगोपन करण्यात येणार आहे. 

हे पण वाचाविना अट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहे

बेळगाव येथील बाल संगोपन समितीचे प्रमुख एम. के. कुंदरगी म्हणाले, 'लहान मुलांवर अत्याचार करणे चुकीचे आहे. त्यांना संगोपन केंद्रात ठेवून जेवण, राहण्याची व शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे.' 

सावत्र आई व वडील सध्या महाराष्ट्रात असून यांच्याविरोधात अजून तक्रार आलेली नाही. हेल्पलाइनवर आलेल्या माहितीवरून अधिकारी आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
 यावेळी पोलिस डी. डी. नागनगौडर, बबन सुतार उपस्थित होते.

संपादन- धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two children rescued from father and Stepmother in belgaum