धक्कादायक ; भाजप कार्यकर्त्याच्या गाडीने तीन महिलांना चिरडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

बेळगाव : भरधाव मोटारीने मागून जोराची धडक दिल्याने दोन पादचारी महिला ठार तर अन्य एकटी गंभीर जखमी झाली. रविवार (ता. 24) रात्री 10.30 च्या सुमारास बेळगाव बागलकोट रोडवरील मुतगा येथे हा अपघात घडला. विद्या भाउसाहेब पाटील (वय 45), सविता बाळकृष्ण पाटील (वय 47 दोघीही रा. प्रभावतीनगर मुतगा) अशी मयतांची नावे असून शांता कृष्णा चौगुले (वय 55, रा. मुतगा) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी कारचालक भाजप कार्यकर्ते युवराज अनंतराव जाधव ( रा. बाळेकुंद्री खुर्द) याच्याविरोधात मारिहाळ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, युवराज जाधव हे काल रात्री केए 22 झेड 3744 या मोटारीतून बेळगाव बागलकोट रोडवरुन बेळगावहून सांबऱ्याकडे चालले होते. भरधाव आणि निष्काळजीणे मोटार चालवित असताना मुतगा येथील पोस्ट कार्यालयानजिक रस्त्याच्याबाजुने चालत जाणाऱ्या तीन महिलांना त्यांनी रात्री 10.30 च्या सुमारास मागून जोराची धडक दिली. त्यामुळे तीघीही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळल्या. त्यानंतर अपघातस्थापासून काही अंतरावर असलेल्या एका व्यापारी अस्थापनाला कार पुन्हा जाउन धडकली.

हे पण वाचा  - ठेवींच्या व्याजालाही `कोरोना व्हायरस`

अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघींनाही खासगी रुग्णालयाकडे नेण्यात येत होते. पण, विद्या आणि सविता यांचा वाटेतच मृत्यू झाला तर शांता यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच मारिहाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार सिन्नुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला. यामध्ये मोटारीचे देखील नुकसान झाले आहे. विवेक भाउसाहेब पाटील (रा. मुतगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी कारचालक युवराज अनंतराव जाधव (रा. बाळेकुंद्री खुर्द) याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. अपघात चालक युवराज देखील जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री जेवणानंतर बाहेर फिरावयास गेलेल्या दोघी महिलांना जीव गमवावा लागल्याने गावात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. कारचालक युवराज जाधव हे तालुक्‍याच्या पुर्व भागातील भाजपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या घटनेची चर्चा राजकिय क्षेत्रादेखील जोरदार सुरु आहे.

हे पण वाचा -  दुचाकी विक्रीसाठी शोरुमधारकांचा हा नवा फंडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two women dead in car accident at belgaum