
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या जन्मगावी बहिरेवाडीत (ता. आजरा) तीन कोटी पाच लाख रुपये खर्च करून भव्य स्मारक उभारले. 23 एप्रिल 2018 रोजी या स्मारकाचे उद्घाटन झाले. मात्र अद्याप या ठिकाणी डॉ. नाईक यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. या ठिकाणी पुतळा उभा करावा, अशी मागणी शिक्षणप्रेमींतून होत आहे. दरम्यान, स्मारकाअंतर्गत शाळेची सुधारणा, गावतलाव सुशोभीकरण, जीवनपट दाखवणारी ध्वनी प्रकाश योजना तयार करणे ही कामे अद्याप प्रलंबित आहेत.
उत्तूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या जन्मगावी बहिरेवाडीत (ता. आजरा) तीन कोटी पाच लाख रुपये खर्च करून भव्य स्मारक उभारले. 23 एप्रिल 2018 रोजी या स्मारकाचे उद्घाटन झाले. मात्र अद्याप या ठिकाणी डॉ. नाईक यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. या ठिकाणी पुतळा उभा करावा, अशी मागणी शिक्षणप्रेमींतून होत आहे. दरम्यान, स्मारकाअंतर्गत शाळेची सुधारणा, गावतलाव सुशोभीकरण, जीवनपट दाखवणारी ध्वनी प्रकाश योजना तयार करणे ही कामे अद्याप प्रलंबित आहेत.
डॉ. जे. पी. नाईक यांच्या जन्मगावी स्मारक व्हावे, ही बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती. या स्मारकाला दहा वर्षांपूर्वी शासनाने हिरवा कंदील दाखवला. ग्रामपंचायतीच्या मालकीची चौदा गुंठे जमीन आहे. या ठिकाणी स्मारक साकारण्यासाठी वाईच्या संदीप गुरव यांनी आराखडा तयार केला.
तीन कोटी पाच लाख रुपये खर्च करून स्मारक उभे राहिले. यामध्ये बहूउद्देशीय सभागृहाचा तळमजला व पहिला मजला बांधला. यासाठी दोन हजार चौरस फुटाचे बांधकाम झाले. जागेच्या व स्मारकाच्या सभोवती नक्षीदार दगडांची भिंत बांधून लोखंडी दरवाजे उभारले. पाणीपुरवठा, विद्युतीकरण, फर्निचर, सभोवतालचे रस्ते, भिंती शिल्पे उभारण्यात आली.
अद्याप या स्मारकासाठी दोन कोटीहून अधिक निधीची गरज आहे. डॉ. जे. पी. नाईक यांच्या मुळ निवासस्थान जतन करून त्याठिकाणी वाचनालय व अभ्यासिका तयार करणे, त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेची सुधारणा करणे, गावतलाव सुशोभित करणे, जीवनपट दाखवणारी ध्वनी प्रकाश योजना तयार करणे ही कामे प्रलंबित आहेत.
मेळ बसत नाही
गेली दोन वर्षे ग्रामपंचायत या स्मारकाची देखभाल व वीज बिल भरते. स्मारकाच्या देखभालीसाठी होणारा खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसत नाही.
- अनिल चव्हाण, सरपंच, बहिरेवाडी
अर्थसंकल्पात घोषणा
कै. बाबासाहेब कुपेकर यांनी विधानसभा अध्यक्ष असताना यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन वित्त मंत्र्यांनी स्मारक उभा करण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली.
मंत्री मुश्रीफ याचे प्रयत्न
2010 मध्ये डॉ. जे. पी. नाईक यांचे स्मारक उभारण्यासाठी एक कोटी 71 लाख 25 हजार रुपये खर्चाचा अंदाजीत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला. 2013-14 रोजी नवीन प्रस्तावास शासनाने मंजूर दिली. या सर्व कामासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी विशेष प्रयत्न केले.