'महाराष्ट्रावर अन्याय करणारा अर्थसंकल्प' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांसाठी लयलूटच करण्यात आली.

कोल्हापूर- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. परंतु या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने महाराष्ट्राची निराशा केली आहे. अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुत्रीफ यांनी केली.

भाजपच्या विरोधातील पक्षाची सत्ता असेल अशा राज्यांना कसा त्रास द्यायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही येत नाही, राज्यासाठी हा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याची टीका  मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.    

येणाऱ्या काळात ज्या राज्यांच्या निवडणुका आहेत त्या राज्यांसाठी तेवढी चांगली तरतूद करण्यात आली असून ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ही तरतूद केली आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांसाठी लयलूटच करण्यात आली.  चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक स्त्रोत आटल्यानंतर  ज्या राज्यांचे देणे आहे, त्यावर अर्थसंकल्पात तरतूद करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता संपूर्ण देशाला दिलासा न देता केवळ निवडणुकीचा राजकीय हेतू समोर ठेवून हा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय झाला. अशी टीका यावेळी मुश्रीफ यांनी केली आहे.

हे पण वाचा - शासनाचे दुर्लक्ष : क्रीडा संघटक पुरस्कार दोन वर्षांपासून बंद

 पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ  म्हणाले, केंद्राकडून राज्याच्या जीएसटीचे 38 हजार कोटी अद्याप येणे बाकी आहे. तरीही महाराष्ट्रावर या अर्थसंकल्पातून अन्याय करण्यात आला आहे. शिवाय या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना निराश करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. गेल्या ६५ दिवसांपासून दोन लाख शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यावर केंद्र सरकार अद्यापही तोडगा काढू शकलेले नाही. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीही मिळाले नसल्याचे देखील यावेळी मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget updates Budget 2021 live updates nirmala sitharaman hasan mushrif