सासू-सुनेतील संवाद वाढविण्यासाठी अनोखी स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

सासू-सून म्हटले की भांडण आणि विसंवाद नजरेसमोर येतो. त्यांच्या या वादात भूमिका कोणती निभवायची हा पुरूषांसमोरचा यक्ष प्रश्‍न. काही अपवाद वगळता समाजात दिसणारे हे सर्रास चित्र. नगरपालिकेने सासू आणि सून या दोन घटकांना केंद्रबिंदू ठेवून जोडी तुझी-माझी ही अनोखी स्पर्धा घेतली. स्पर्धा जिंकण्याच्या निमित्ताने सासू-सुनेतील समन्वय आणि त्यांच्यातील संवाद वृद्धीगंत होण्यास मदत झाली. 

गडहिंग्लज : सासू-सून म्हटले की भांडण आणि विसंवाद नजरेसमोर येतो. त्यांच्या या वादात भूमिका कोणती निभवायची हा पुरूषांसमोरचा यक्ष प्रश्‍न. काही अपवाद वगळता समाजात दिसणारे हे सर्रास चित्र. नगरपालिकेने सासू आणि सून या दोन घटकांना केंद्रबिंदू ठेवून जोडी तुझी-माझी ही अनोखी स्पर्धा घेतली. स्पर्धा जिंकण्याच्या निमित्ताने सासू-सुनेतील समन्वय आणि त्यांच्यातील संवाद वृद्धीगंत होण्यास मदत झाली. 

नगरपालिकेने शहरातील प्रत्येक घटकांसाठी काही ना काही उपक्रम राबवित असते. युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडू, साहित्य, नाट्यप्रेमी अशा सर्वांना आनंददायी ठरावे असे, कार्यक्रम घेवून पालिकेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सासू-सून या दोन घटकांना एकमेकांना समजून घेवून वाटचाल करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, महिला-बालकल्याण सभापती श्रद्धा शिंत्रे, उपसभापती सुनिता पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, विभागप्रमुख अवंती पाटील यांनी केला. त्यासाठी प्रा. शिवाजी पाटील यांच्या सहकार्याने जोडी-तुझी माझी ही स्पर्धा भरविण्यात आली होती. 

शहरातील प्रत्येक भागातील सासू-सुनांना संधी देण्यासाठी विठ्ठल मंदिर, अयोध्यानगर, बेलबाग, आंबेडकर भवन याठिकाणी साखळी स्पर्धा घेतली. त्यातून 18 जोड्या अंतिम स्पर्धेसाठी निवडल्या. प्रत्यक्षात 15 जोड्या अंतिम स्पर्धेत सहभाग घेतला. साखळी ते अंतिम स्पर्धेसाठी आठ-दहा दिवसांचा कालावधी लागला.

या दरम्यान सासू-सुनांनी एकमेकांत समन्वय साधून स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्यातील संवाद वृद्धीगंत करण्याचा प्रयत्न केला. या समन्वयातूनच सासू-सुनेच्या जोडीने स्पर्धेदरम्यान आपल्या ओळख परेडपासून रॅंप वॉक, फॅन्सी ड्रेस, नृत्य, वेणी घालणे, बकेटमध्ये चेंडू टाकणे, हात रूमालाच्या घड्या घालणे, ऍक्‍शनवरून चित्रपटाचे नाव सांगणे, डोळे बांधून चेंडू शोधणे आणि तो सासूच्या बकेटमध्ये टाकणे आदी स्पर्धा प्रकार अलगदपणे पार केल्या.

स्पर्धेत यश मिळवणे हा भाग दुय्यम असला तरी स्पर्धेच्या माध्यमातून सासू-सूनेतील सुसंवाद वाढवण्यासाठी चांगले व्यासपीठ पालिकेने निर्माण केले, एवढे मात्र निश्‍चित. तशा प्रतिक्रियाही सासू-सुनांनी स्पर्धेदरम्यान दिल्या. या स्पर्धेसाठी सारिका पाटील यांनी लिहलेले टायटल सॉंग राधिका पाटील हिने गायिले होते. या वेळी नगरसेविका, कर्मचारी, महिला उपस्थित होत्या. 

स्पर्धेतील विजेत्या जोड्या 
जोडी-तुझी माझी स्पर्धेत रेवती इनामदार-माधुरी इनामदार (प्रथम), सुलोचना जाधव-सीमा जाधव (द्वितीय), उमा कट्टीकर-रूपाली कट्टीकर (तृतीय), सरोजिनी सुतार-रेखा सुतार (चतुर्थ), वसुंधरा सावंत-किर्तीदेवी सावंत (पाचवा), प्रभा सावळे-माधुरी सावळे, मनिषा गंधवाले-सागर गंधवाले (उत्तेजनार्थ) या जोड्यांनी चांगले यश मिळविले. त्यांना पारितोषिके देवून पालिकेतर्फे गौरवण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique Competition For Develop communication Between Mother-In-Law And Daughter-In-Law Kolhapur Marathi News