बेळगाव महापालिकेत पुन्हा अवतरली वॉकी-टॉकी, वीस वर्षानंतर वापर  

मल्लिकार्जुन मुगळी
बुधवार, 29 जुलै 2020

येत्या काही दिवसात पालिकेच्या महसूल विभागालाही वॉकी-टॉकी देण्यात येणार आहे.  

बेळगाव - अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी तब्बल 20 वर्षानंतर महापालिका प्रशासन पुन्हा वॉकी-टॉकीकडे वळले आहे. सध्या आरोग्य, बांधकाम व पर्यावरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वॉकी-टॉकी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 50 वॉकी-टॉकी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यांचे वितरणही करण्यात आले आहे. त्यांचा अनौपचारीक वापर सुरू झाला आहे. येत्या काही दिवसात पालिकेच्या महसूल विभागालाही वॉकी-टॉकी देण्यात येणार आहे. सध्या आरोग्य निरीक्षकांनी वॉकी-टॉकीचा वापर सुरू केला आहे. त्यांचा मोबाईल व सोबत वॉकी-टॉकी घेवून ते सेवेत आहेत. 

20 वर्षापूर्वी बेळगाव महापालिकेत वॉकी-टॉकीचा वापर केला जात होता. खासकरून आरोग्य विभागात त्याचा वापर होत होता. त्यावेळी आरोग्य निरीक्षकांकडे वॉकी-टॉकी होते. त्यामुळे शहर स्वच्छतेसंदर्भात एकमेकांशी संवाद साधणे सोपे होत होते. शहर स्वच्छतेबाबत वरीष्ठांना अहवाल देणेही त्यांना सोपे होत होते. प्रशासकीय सुसंवाद साधण्यासाठीही वॉकी-टॉकीचा वापर केला जात होता. पण 2000 सालानंतर आधी पेजर व नंतर मोबाईलचा वापर सुरू झाला. त्यामुळे वॉकी-टॉकीचा वापर बंद होत गेला. 2012 नंतर तर व्हॉट्‌सऍप व अन्य समाजमाध्यमांमुळे तर संवाद साधणे सोपे झाले. महापालिकेचे विभागनिहाय व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करण्यात आले. त्या माध्यमातून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांपर्यंत निरोप पोहोचविणेही सोपे झाले. तरीही वॉकी-टॉकीचा वापर पुन्हा सुरू करण्याची चर्चा गेल्या दोन तीन वर्षापासून महापालिकेत सुरू होती. कोरोना काळात या वॉकी-टॉकीला महत्व प्राप्त झाले. मोबाईलचा वापर वाढला असला तरी पोलिस खात्याने अद्याप वॉकी-टॉकीचा वापर बंद केलेला नाही. त्यामुळे महापालिकेतही वॉकी-टॉकीचा वापर सुरू करण्याचा निर्णय आयुक्त के. एच. जगदीश यानी घेतला. त्यानुसार वॉकी-टॉकी खरेदी करण्यात आले आहेत. 

हे पण वाचा - शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना मिळणार माध्यान्ह आहार

 

 महापालिकेचे दोन्ही शहर अभियंते, सर्व सहाय्यक कार्यकारी अभियंते, इलेक्‍ट्रीक विभागाचे सहाय्यक अभियंते, पर्यावरण अभियंते, आरोग्य निरीक्षक व आरोग्याधिकारी यांना वॉकी-टॉकी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. वॉकी-टॉकीच्या ध्वनी लहरींसाठी दोन ठिकाणी अँटेना उभारण्यात आला आहे. एक अँटेना लक्ष्मी टेकडी येथे आहे तर दुसरा महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आहे. मुख्य कार्यालयातच चोविस तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सध्या महापालिकेकडून सुरू आहे. ज्यांना वॉकी-टॉकी देण्यात आले आहेत, त्यांनी त्यांचा वापर केलाच पाहिजे अशी स्पष्ट सूचना आयुक्तानी दिली आहे. 

महापालिकेतील आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वॉकी-टॉकी देण्यात आले आहेत. भविष्यात महसूल विभागालाही देण्याचे नियोजन आहे.
-आदीलखान, पर्यावरण अभियंते 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of walkie talkie again in Belgaum Municipal Corporation