esakal | सीमाभागात भाजी, किराणा टंचाईची भीती ; आंतरराज्य वाहतुकीवर कडक निर्बंध
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetables grocery scarcity in belgaum maharashtra border area

किराणा या जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई भासण्याची भीती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी सहा सदस्यीय समिती स्थापन करून गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍यात टंचाई जाणवणाऱ्या गावात जीवनावश्‍यक वस्तू पोहचवण्यासाठी ज्या त्या गावांमधील भाजी उत्पादकांची यादी तयार करण्याची सूचना केली आहे.

सीमाभागात भाजी, किराणा टंचाईची भीती ; आंतरराज्य वाहतुकीवर कडक निर्बंध

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : महाराष्ट्राच्या सीमाभागातील जनतेचा शेजारच्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याशी संपर्क असतो. आता बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण असल्याने आंतरराज्य वाहतुकीवर कडक निर्बंध आहेत. परिणामी महाराष्ट्रातील सीमाभागात भाजी आणि किराणा या जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई भासण्याची भीती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी सहा सदस्यीय समिती स्थापन करून गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍यात टंचाई जाणवणाऱ्या गावात जीवनावश्‍यक वस्तू पोहचवण्यासाठी ज्या त्या गावांमधील भाजी उत्पादकांची यादी तयार करण्याची सूचना केली आहे.

देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍याला खेटून कर्नाटकची हद्द आहे. लॉकडाऊनच्या काळात सीमाभागातील गावांमध्ये भाजीपाला आणि किराणा मालाची ने-आण कर्नाटकातून होत होती. दरम्यान, आता बेळगाव जिल्ह्यात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातून बेळगावकडे आणि कर्नाटकातून गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍याकडे येणारी सर्व वाहतूक बंद केली आहे. अशा परिस्थितीत या तालुक्‍यांतील उत्पादकांचा शेतमाल खराब होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाबाधित बेळगावमधूनही महाराष्ट्रात येणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहनांवर कडक निर्बंध आहेत. लॉकडाऊनच्या काळात कर्नाटकातील भाजी या भागात येत होती. आता अधिक निर्बंधामुळे ही वाहतूक थांबली आहे. विशेष करून चंदगड तालुक्‍यात भाजी व किराणा या दोन्ही मालाची टंचाई जाणवण्याची भीती अधिक आहे.

दुसरीकडे, या भागातून कर्नाटकात जाणारी भाजीही शिल्लक राहणार आहे. म्हणून शेतकऱ्यांकडे असलेला अतिरिक्त भाजीपाला जेथे टंचाई आहे, त्या ठिकाणी पोहचवण्याचे नियोजन करावे लागेल. जेणेकरून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही आणि ग्राहकांनाही विनासायास भाजीपाला मिळेल. चंदगडमधील दुकानदारांना किराणा माल मिळणेही अडचणीचे ठरत आहे. या दोन्ही वस्तू टंचाईच्या ज्या-त्या गावापर्यंत पोहचवण्यासाठी पुरवठादार, मागणीधारक गावांमध्ये समन्वय साधून गरजूंना माल सुरळीत पुरवावा लागणार आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी पी. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश श्रीमती पांगारकर यांनी दिले आहेत.

यामध्ये ग्राम दक्षता समिती अध्यक्षांचाही समावेश असेल. 
काय असेल समितीचे काम गावनिहाय उपलब्ध भाजीपाला (सर्व प्रकारचा माल) उत्पादकांची यादी दक्षता समिती अध्यक्षांनी तयार करावयाची आहे. त्यानंतर आवश्‍यक व टंचाईच्या गावांतील भाजीपाला मागणीची यादी तयार करणे, कमी वेळेत व खर्चातील वाहतुकीचे नियोजन करून पुरवठादार व मागणीदरात समन्वय साधणे, वाहतूक आराखडा निश्‍चित करणे, आवश्‍यक ती परवानगी घेणे, वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍यातील गावांमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी समितीवर असेल. यावर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील.


 

go to top