देवकांडगावमध्ये बचत गटातून फुलली परसबाग

रणजित कालेकर
Monday, 21 September 2020

देवकांडगाव (ता. आजरा) येथील महिलांनी आत्मनिर्भर होत स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा दैनंदिन भाजीपाला उत्पादित केला आहे. त्याचबरोबर गावपातळीवर विक्रीदेखील सुरू आहे.

आजरा : देवकांडगाव (ता. आजरा) येथील महिलांनी आत्मनिर्भर होत स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा दैनंदिन भाजीपाला उत्पादित केला आहे. त्याचबरोबर गावपातळीवर विक्रीदेखील सुरू आहे. त्यामुळे ताजा व सकस सेंद्रिय भाजीपाला ग्रामसंघाच्या सदस्यांसह ग्रामस्थांना मिळत आहे. लॉकडाउन काळात प्रदर्शनीय परसबाग या उपक्रमाद्वारे संस्कृती महिला ग्रामसंघाने हा नवा पायंडा पाडला आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतर्फे (उमेद) तालुक्‍यात 651 बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू आहेत. यामध्ये तालुकास्तरीय प्रदर्शनीय परसबाग, वैयक्तिक परसबाग, सामूहिक परसबाग तयार करून सेंद्रिय भाजीपाला पिकवून कुटुंबाची दैनंदिन गरज भागवायची त्याचबरोबर विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत देवकांडगाव येथील संस्कृती महिला ग्रामसंघाने लॉकडाउन काळात तीन गुंठे क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाल्याची शेती (परसबाग) केली आहे. यामध्ये 12 बचत गटाच्या 120 महिलांनी सहभाग घेतला आहे.

घेवडा, गवार, वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी, चहापती, ढब्बू मिरची यासह विविध भाज्यांचे उत्पादन घेतले आहे. या गटाचा पहिलाच प्रयत्न असून, अतिवृष्टीमध्ये गवार, वांगी यासह रोपांना फटका बसला. पाणी साचल्याने रोपे कुजून नुकसान झाले, तरीही महिला बचत गटाच्या सदस्यांनी जिद्द न हारता पुन्हा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली.

तीन गुंठ्यांत वर्तुळ आखून त्यामध्ये त्रिकोणी वाफ्यात लागवड केली आहे. कंपोष्ट खतासाठी खड्डा खोदून त्यामध्ये पालापाचोळा कुजविले आहे. हे खत भाजीपाल्यासाठी वापरले जात आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर कटाक्षाने टाळला आहे. सकस, ताजी भाजी पुरवण्यावर ग्रामसंघाचा भर आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाली असून, कुटुंबाची गरज भाजवण्याबरोबर गावात विक्री सुरू झाली आहे. या बचत गटांना पंचायत समिती सभापती उदयराज पवार, उपसभापती वर्षा बागडी, सदस्य व गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे. 

आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न
कुटुंबाला लागणारा भाजीपाल्या आणि विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुटुंबातील सदस्य, ग्रामस्थ व शिक्षकांचे सहकार्य आहे. शासन व अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळत आहे. 
- अर्चना देसाई, समुदाय संसाधन व्यक्ती प्रेरीका, देवकांडगाव 

चळवळीचे उद्देश सफल
लॉकडाउन काळात भाजीपाला व दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे अडचणीचे झाले होते. देवकांडगाव येथील महिलांनी राबविलेल्या उपक्रमामुळे सामान्यांना दिलासा मिळत आहे. बचत गट चळवळीचे उद्देश सफल होताना दिसत आहे. 
- एस. टी. कराळे, तालुका अभियान व्यवस्थापक, पी. एन कांबळे, तालुका व्यवस्थापक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetables Grown Through Self-Help Groups Kolhapur Marathi News