
सध्याच्या युगात रेडिमेडची चलती आहे. याला कोणतेच क्षेत्र अपवाद नाही. गणेशमूर्तीचेच उदाहरण घ्यायचे, तर त्याला प्लास्टर पद्धतीने घेरले आहे. परंतु, काही हरहुन्नरी कलाकारांनी मेहनतीने पारंपरिक शाडूच्या मूर्तीची कास अद्याप सोडलेली नाही.
गडहिंग्लज : सध्याच्या युगात रेडिमेडची चलती आहे. याला कोणतेच क्षेत्र अपवाद नाही. गणेशमूर्तीचेच उदाहरण घ्यायचे, तर त्याला प्लास्टर पद्धतीने घेरले आहे. परंतु, काही हरहुन्नरी कलाकारांनी मेहनतीने पारंपरिक शाडूच्या मूर्तीची कास अद्याप सोडलेली नाही. यात येथील ज्येष्ठ अष्टपैलू कलाकार यशवंत कुंभार यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. मूर्तीकामात चार दशकापासून त्यांची तपश्चर्या सुरू आहे. व्यावहारिक जगातही वस्तू विनिमय पद्धत कायम ठेवत स्थानिक दीडशे कुटुंबीयांशी बांधिलकी जपली आहे. दरम्यान, पूर्वी बैलगाडीने बिनखर्चात आणला जाणारा शाडू आज पाच हजार 500 रुपये ट्रॉली असून 50 पैसे असणारी मूर्तीची किंमत 500 रुपयांहून अधिक झाली आहे, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
कुंभार कुंटुबातच जन्म झाल्याने बालपणापासून त्यांना मातीकामाची गोडी लागली. वडील भैरू, चुलते जोतिबा, बंधू यदू यांनी प्रोत्साहन दिले. सुरवातीला नाग, गुळव्वा व गणोबातून मूर्तीकामाला गती आली. वयाच्या विशीपासून गणेश मूर्तीकामाचा श्रीगणेशा केला. सकाळी सातपासून सुरू झालेला दिवस मूर्तीला आकार, रूप देण्यातच मावळतो. पत्नी इदुंबाई यांच्या सहकार्याने दरवर्षी सुमारे 550 हून अधिक शाडूच्या मूर्ती घडवितात. शहर परिसरासह तालुक्यातील जाभुंळवाडी, सावतवाडी येथील ग्रामस्थ या शाडूच्या मूर्ती आवर्जून नेतात. रंगकामासाठी त्यांना मित्र परिवाराची मदत मिळते. ग्रामदैवत श्री काळभैरवाची फेब्रुवारीत यात्रा झाली की मूर्तीकामाचा नारळ फुटतो.
सरोळी, निंगुडगे (ता. आजरा) येथून शाडू आणली जाते. पूर्वी बैलगाडीने बिनखर्चात आणला जाणारा शाडू आज पाच हजार 500 रुपये ट्रॉली असून 50 पैसे असणारी मूर्तीची किंमत 500 रुपयांहून अधिक झाली आहे. शाडू भरणे, साचे बनविणे यातच एप्रिल उजाडतो. जूनमधील कर्नाटकी बेंदुरापासून खऱ्या अर्थाने मूर्तीला रूप आणण्याच्या प्रकियेला वेग येतो. पुरातन सिंहासन, गोट्या या रूपातील मूर्तीना अधिक मागणी आहे. अलीकडे दगडूशेठ, मोर, बदक, बाहुबली यांनाही नव्या पिढीची पसंती आहे. शाडूच्या मूर्तीला अधिक कलाकुसर असल्याने फुटभर उंचीचे दोन, तर दीड फुटाची एकच मूर्ती दिवसभरात आकाराला येते.
गणेश मूर्तीसह मडकी, सिंमेटच्या मूर्ती, दुर्गा मूर्ती, मंदिराचे शिखर काम, रंग कामात ते वर्षभर मग्न असतात. वयाच्या एकसष्ठीतही त्यांचे हात थकलेले नाहीत. त्यांचा बैल, गुळव्वा, नाग आणि गणेशमूर्ती यामाध्यमातून बलुतेदारीची पारंपरिक वस्तू विनमय पद्धतीने दीडशे कुटुंबीयांशी घरोबा आहे. शहराचा वाढलेला विस्तार व महागाईच्या झळातही पिढयानपिढयांच्या नातेसंबधासाठीच ही पद्धत त्यांनी जपली आहे. कुंभारवाड्यात चाळीसहून अधिक कुटुंबे गणेशमूर्ती बनवतात. यात प्रकाश शेंडूरे, विष्णू कुंभार, चद्रंकात कुंभार, राजू शेंडूरे, नारायण कुंभार, अनिल कुंभार, आप्पा कुंभार, शंकर कुंभार या कुटुंबीयांनीही शाडू मूर्तीची परंपरा टिकवली असल्याचे यशवंत कुंभार यांनी नम्रपणे नमूद केले.
शाडू मूर्तीमुळेच कला जीवंत राहिल
शाडू मूर्ती घडवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे उत्पादनाच्या दृष्टीने परवडत नसल्याने यापासून नवी पिढी दूर आहे. शासन निर्णयानुसार पुढील वर्षापासून सर्वांनाच पर्यावरणपूरक शाडू मूर्तीकडे वळावे लागणार आहे. पण, शाडू मूर्तीमुळेच कला जिंवत राहणार आहे.
- यशंवत कुंभार, मूर्तिकार, गडहिंग्लज
संपादन - सचिन चराटी