सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 32 फुटावर : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

विष्णू मोहीते
Thursday, 15 October 2020

पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नदीकाठावर सावधानता बाळगण्याचे आवाहन

सांगली : गेली दोन दिवस सुरु असलेल्या वादळी पाऊसामुळे कोयना धरणातून 34 हजार 211 क्‍युसेकने सुरु असलेल्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 32 फुटावर गेली आहे. गेल्या 24 तासात 22 फुटांनी पाणी पातळी वाढली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्‍यापैकी आठ तालुक्‍यात अतिवृष्टी झाली आहे.

जिल्ह्यात पलूस तालुक्‍यात 130.2 मिलिमिटर पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 85.97 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. पलूस तालुक्‍यात सर्वाधिक 130.2 मिलिमिटर पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमिटरमध्ये अशी- मिरज 97 (756.2), तासगाव 86.5 (682.4), कवठेमहांकाळ 90.6 (758.8), वाळवा-इस्लामपूर 96.7 (859.3), शिराळा 59.7 (1438.7), कडेगाव 69.4 (746.7), पलूस 130.2 (724), खानापूर-विटा 105.6 (987.8), आटपाडी 96.7 (951.9), जत 49.9 (531.1).

कोयना धरण 99.39 टक्के भरले असून धरणात 104.612 टी.एम.सी. पाणीसाठा आहे. धरणातून सद्यस्थितीत 34 हजार 211 घफू/सें इतका विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची आर्यविन पूल येथील दुपारी 1 वाजता पाणीपातळी 32 फूट झाली होती. 16 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत अंदाजे 35 ते 36 फूट इतकी पाणीपातळी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नदीकाळच्या वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्‍यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील, सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये. तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water level of Krishna river in Sangli is 32 feet