पुणे, मुंबईसह परप्रांतीयांना या हद्दीतून सहज सांगली जिल्ह्यात मिळतोय प्रवेश...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

दिघंचीत जिल्हा हद्दीवर चेकपोस्ट पोलिसांविनाच... 

दिघंची (सांगली) - सोलापूर, सांगली, सातारा हे तीन जिल्हे व दिघंचीच्या सरहद्दीवर असणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या सीमा रेषेवर चेकपोस्ट पोलिसां विना आहे. येथून वाहने बिनधास्तपणे दिघंची (सांगली) हद्दीत प्रवेश करीत आहेत. या वाहनांतून येणारा एखादा रूग्ण असू शकतो. वेळीच ब्यारिकेट लावणे गरजेचे आहे. 

दिघंची तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेले गाव आहे. याच गावातून मल्हारपेठ-पंढरपूर असा 76 क्रमांकाचा राज्यमार्ग आहे. जिल्ह्याचा शेवटच्या टोकाला उंबरगाव, तर दिघंचीपासून 7 किमी अंतरावर सोलापूरची हद्द सुरू होते. दिघंचीच्या पश्‍चिमेला नऊ किमी अंतरावर सातारा हद्द सुरू होते. सध्या सांगली जिल्हा हद्द बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केला आहे. या ठिकाणी सोलापूर व सातारा हद्दीतून वाहनांची मोठ्याप्रमाणात ये जा सुरू आहे. 
पुणे, मुंबईहून येण्यासाठी पुणे, इंदापूर, अकलूज, महुद मार्गे सोलापूर हद्दीतून सहजपणे दिघंचीत प्रवेश करता येतो. मुंबई-पुणेहून सासवड, जेजुरी, फलटण, दहिवडी, म्हसवड तर दुसरा सातारा, कोरेगाव, पुसेसवळी, गोंदवले, म्हसवड मार्गे सातारा हद्दीतून दिघंचीमध्ये प्रवेश करता येतो. बाहेरगावाहून येणाऱ्यांची "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर तपासणी होणे गरजेचे आहे. 
 

"दिघंचीजवळील सोलापूर व सातारा जिल्हा हद्दीवर लवकरच पोलीस पाठवणार आहे. तेथे ब्यारिकेट उभारून कोणी संशयीत आहे का ? याची तपासणी करणार.'' 
-बजरंग कंबळे, पोलीस निरीक्षक 

"जिल्हा सीमारेषेवर लवकरच ब्यारिकेट उभारणार आहे. सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील तलाठी, आरोग्याधिकाऱ्यांची कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष देणे व गावात माहिती घेणे यासाठी समिती नेमण्यात येत आहे.'' 
-सचिन लंगूटे, तहसीलदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without police station at checkpost on Dighanchi sangli district border