क्षात्र जगद्‌गुरू पीठाचे कार्य कौतुकास्पद ; श्रीमंत शाहू छत्रपती महाराज 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

प्रास्ताविकात क्षात्र जगद्‌गुरू पीठाचे संजयदादा बेनाडीकर यांनी शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती दिली.

कडगाव : पाटगाव (ता. भुदरगड) येथील क्षात्र जगद्‌गुरू पीठाचे शिव-शाहूंचे विचार रुजविण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केले. शतक महोत्सवी संत मौनी महाराज मठाच्या ऐतिहासिक वस्तूंच्या पुनरुज्जीवित उपक्रमांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. खासदार संभाजीराजे, विजयसिंह बेनाडीकर व संजयदादा बेनाडीकर प्रमुख उपस्थित होते. 

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ""छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने बहुजन समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या पुराणोक्त वेदांना विरोध करण्यासाठी देशातील पहिले क्षत्रिय जगद्‌गुरू पीठ पाटगाव येथे स्थापन केले. छत्रपती व बेनाडीकर कुटुंबांचे संबंध जिव्हाळ्याचे असून पीठाच्या लोकसहभागातून ऐतिहासिक वास्तू पुनरुज्जीवित उपक्रमासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्‍यक आहे.'' 

प्रास्ताविकात क्षात्र जगद्‌गुरू पीठाचे संजयदादा बेनाडीकर यांनी शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती दिली. श्रीमंत क्षात्र जगद्‌गुरू मौनीमहाराज संस्थान पीठाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व शस्त्र संग्राहक समाधान सोनाळकर यांच्या शस्त्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. सूरज ढोली व सहकाऱ्यांच्या मर्दानी खेळांचे व डॉ. आझाद नाईकवडी यांच्या पोवाड्यांचे सादरीकरण केले. 

महेंद्रसिंह बेनाडीकर, हर्षल बेनाडीकर, शिवजीत बेनाडीकर, अश्विन बेनाडीकर, पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, माजी सभापती धनाजीराव देसाई, माजी उपसभापती सत्यजित जाधव, माजी जि.प.सदस्य राहुल देसाई, प्रा.अर्जुन कुंभार, डॉ. रविकुमार जाधव, शिल्पकार एम. डी. रावण, डॉ. सुभाष देसाई, संदेश भोपळे आदी उपस्थित होते. मनजीत बेनाडीकर यांनी आभार मानले. 

हे पण वाचाबेटिंग घेणाऱ्या सात जणांना अटक ; इचलकरंजीत दोन छापे

 

पीठास सर्वतोपरी मदत 
खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शहाजीराजे यांचा राज्यभिषेक क्षात्र जगद्‌गुरूंकडून करण्यात आला, यामुळे क्षात्र जगद्‌गुरूंविषयी असणारे महत्त्व सिद्ध होत असून या शतक महोत्सवात नियोजित कार्यास लोकसहभागासोबतच सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मत व्यक्त केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of Kshatra Jagadguru Peetha is admirable say Shrimant Shahu Chhatrapati Maharaj