आजऱ्यात भूमि अभिलेख कार्यालयातील कामे खोळंबली

रणजित कालेकर
Thursday, 27 February 2020

आजरा उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तालुक्‍यातील रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पातील भूसंपादाच्या कामात अडकल्यामुळे याचा परिणाम दैनंदिन कामांवर होत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर एकीकडे या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कामाचा ताण उर्वरीत कर्मचाऱ्यांवर पडत आहे, तर दुसरीकडे कार्यालयात 260 प्रकरणे प्रलंबित असून तालुक्‍यातील नागरीकांचे हेलफाटे सुरू आहेत. 

आजरा : उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तालुक्‍यातील रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पातील भूसंपादाच्या कामात अडकल्यामुळे याचा परिणाम दैनंदिन कामांवर होत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर एकीकडे या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कामाचा ताण उर्वरीत कर्मचाऱ्यांवर पडत आहे, तर दुसरीकडे कार्यालयात 260 प्रकरणे प्रलंबित असून तालुक्‍यातील नागरीकांचे हेलफाटे सुरू आहेत. 

जमीन मोजणीशी महत्वाचे असलेले हे कार्यालय आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेची कामे या कार्यालयावर अवलंबून असतात. जमिन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, बॅंक बोजा, बॅक प्रकरण, वारस नोंद, खरेदी नोंद यासह विविध कागदपत्रे दररोज नागरिकांना लागत असतात. त्यामुळे या कार्यालयात विविध प्रकारचे दाखले व नकलासाठीही नागरीकांची नेहमीच ये-जा असते. या तालुक्‍यात सर्फनाला, उचंगी व आंबेओहळ प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू आहे. या प्रकल्पातील भूसंपादनाची कामे मार्गी लागण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी यांची मागणी सातत्याने होत आहे. भूसंपादनासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ द्यावा लागत असल्याने याचा परिणाम दैनंदिन कामावर होत आहे. या कार्यालयाकडील जमीन मोजणीची 260 प्रकरणे पडून आहेत.

नागरीक आपल्या कामासाठी हेलफाटे मारत आहेत. त्यांना काय उत्तर द्यावयाचे हा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे. त्याचबरोबर या कार्यालयाकडील सात पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा ताण उर्वरीत कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे कामाचा उरक होईनासा झाला आहे. नागरीकांच्यातून नाराजी व्यक्त होत असून या कार्यालयातील पदे तातडीने भरून नागरिकांची दैनंदिन कामे मार्गी लागावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

रिक्त जागा भराव्यात
कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, पाटबंधारे व अन्य अनुषंगीक कामांमुळे या कार्यालयातील नागरिकांची कामे खोळंबत आहेत. या कार्यालयातील कामांचा उरक होण्यासाठी रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे करणार आहे. 
- आनंदराव कुंभार, नगरसेवक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work On The Land Records Office Was Disrupted In Ajara Kolhapur Marathi News