esakal | दराच्या आकर्षणाने वाढली मिरची लागण; मात्र यंदा शिल्लक मिरचीमुळे हमी भावाचा प्रश्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

This Year, The Question Of Guaranteed Price Due To The Remaining Chillies

गतवर्षी अतिवृष्टीत मिरचीला फटका बसला. उत्पन्न कमी आले. दर भडकले. स्थानिक जवारी मिरची 1200 रूपये प्रति किलोवर पोहोचली. कर्नाटकातून येणाऱ्या बॅडगी मिरचीचा दरही दरवर्षीपेक्षा शंभर ते दीडशे रूपयांनी वाढला.

दराच्या आकर्षणाने वाढली मिरची लागण; मात्र यंदा शिल्लक मिरचीमुळे हमी भावाचा प्रश्‍न

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : दरवर्षी उच्चांकी दरामुळे ग्राहकांना झोंबणारी जवारी मिरची यंदा उत्पादकांनाच झोंबण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. चांगल्या दरामुळे यंदा जवारीसह इतर मिरचीची लागण वाढली असली तरी कोरोना लॉकडाऊनमुळे गतवर्षीच्या शिलकी मिरचीमुळे हमी भावाचा प्रश्‍न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर उत्पादकांना यंदा चांगला दर पदरात पडणार का, याचे उत्तर आता प्रत्यक्ष हंगाम सुरू झाल्यानंतरच मिळणार आहे. 

गतवर्षी अतिवृष्टीत मिरचीला फटका बसला. उत्पन्न कमी आले. दर भडकले. स्थानिक जवारी मिरची 1200 रूपये प्रति किलोवर पोहोचली. कर्नाटकातून येणाऱ्या बॅडगी मिरचीचा दरही दरवर्षीपेक्षा शंभर ते दीडशे रूपयांनी वाढला. मार्च, एप्रिल व मे या महिन्यात ग्राहकांची मिरची खरेदीसाठी बाजारात झुंबड असते. परंतु यंदा नेमक्‍या याचवेळी कोरोनामुळे लॉकडाऊन झाला. यात मिरचीचे सौदे बंद होण्यासह खरेदी-विक्रीही थांबली.

गतवेळी आठशे रूपये किलोने काही व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली जवारी मिरची अजूनही शिल्लक आहे. या मिरचीचा आता उठाव नाही. सध्या मिरची विक्रीचाही हंगाम नाही. परिणामी जवारी मिरचीत मोठी गुंतवणूक केलेल्या व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अनलॉक झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यांमध्ये मिरचीची विक्री झाली. गावागावात विक्रेते पोहचून विक्री केली.

वर्षाच्या चटणीची बेगमी करून ठेवण्यासाठी अनलॉकमध्ये मिरचीची खरेदी जोरात झाली. परंतु, यावेळी जवारी मिरचीला वाढीव दरामुळे नगण्य मागणी होती. बॅडगी व इतर जातीच्या मिरची खरेदीकडे ग्राहकांचा कल राहिला. 
गतवर्षी वाढीव दर मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांना मिरची लागवडीसाठी प्रोत्साहन मिळाल्याचे चित्र आहे. सर्वत्र उसाचे क्षेत्र असल्याने मिरची लागवड अलीकडे कमीच झाली होती. खुद्द अनेक शेतकरी कुटूंबेच बाजारातून मिरची विकत नेतात.

प्रचंड दराने मिरची न्यावी लागल्याने किमान घरच्यापुरते तरी मिरची लागवड करायची या मानसिककेतूनही लागवडीत भर पडली आहे. विशेषत: जवारी मिरचीला मिळालेला दर शेतकऱ्यांना आकर्षित केला आहे. यामुळे जवारी मिरचीच्या लागणीत वाढ झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गतवर्षीची मिरची काही व्यापाऱ्यांकडे शीतगृहात शिल्लक आहे. यामुळे नवीन बाजारात येणाऱ्या मिरचीला किती दर मिळतो, हा प्रश्‍न आहे. गतवर्षीची शिल्लक आणि नवीन आवकेच्या मिरचीमुळे दराची हमी किती मिळणार, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. 

कोरोनाचे सावट... 
स्थानिक जवारी मिरचीची आवक सप्टेंबरमध्ये सुरू होते. कोरोना संसर्गाची सद्यस्थिती पाहता ती लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये मिरचीचे सौदे होणार काय, सौदे झालेच तर फिजीकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरची कडक अमलबजावणी होणार का हा प्रश्‍न आहे. कोरोना संसर्गातच यंदाचा हंगाम गेला आहे. येणारा हंगामही त्यातच अडकला, तर शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाच्या विक्रीचा प्रश्‍न येणार आहे. यावर पर्याय म्हणून जर शेतकरी स्वत:हून गावागावात जावून मिरचीची विक्री केल्यास तो अधिक फायद्यात येवू शकतो. परंतु, हा पर्याय किती शेतकरी स्वीकारतात, हा प्रश्‍न आहे. 

गडहिंग्लज तालुक्‍यातील तुलनात्मक मिरची लागवड 
- दरवर्षी सरासरी लागवड : 185 हेक्‍टर 
- यावर्षीची लागवड : 225 हेक्‍टर 

संपादन - सचिन चराटी

go to top