तरूणाई एकवटली..अन्‌ घरे सजली 

Young people are alone ... and homes are decorated
Young people are alone ... and homes are decorated
Updated on

कोल्हापूर : राघुचा धनगरवाडा म्हणजे शाहूवाडीचे एक टोक आणि चांदोलीच्या मार्गावरची चाळीस पन्नास घरांची वस्ती, वाडा रस्त्यालगतच पण तेथे विकास पोहोचायला मात्र उशीर झाला आहे.

त्यामुळे जे वाट्याला आले तसं जगायचं, अशीच तिथल्या रहिवाशांची मानसिकता त्यामुळे धनगरवाड्याची अवस्था पिढ्यानपिढ्या जशीच्या तशी, एक मात्र अपवाद की गावात दारूचा थेंब नाही आणि दारूच्या थेंबाला स्पर्श करणारा एकही माणूस गावात नाही. गावात कोणी दारू पिऊन आला किंवा द्यायचा प्रयत्न केला तर त्याला अशी जबरी शिक्षा की पुन्हा त्याच्या तोंडून दारू हा शब्दही कधी बाहेर येणार नाही. 

पण अशा या धनगरवाड्यात उदरनिर्वाहासाठी पारंपरिक शेती हाच आधार. सगळी शेती पावसावर अवलंबून असलेली. त्यामुळे राहणीमान साधे. तरुण मुंबई, कोल्हापूर, कराड, इस्लामपूरला नोकरीला. आणि गावातील बायाबापड्या आपापल्या त्याच त्या कामात कायम गुरफटलेली. अशा या राघूच्याधनगर वाड्याचे बाह्यरूप मात्र काही दिवसात बदलले आहे. कधीही चांगल्या रंगाचा स्पर्श न झालेली या धनगरवाड्यातील घरे देखणे रूप घेऊन उभी राहिली आहेत. या घरावर साध्या-सोप्या पद्धतीने रंगांची सजावट केली आहे. कोठेही आणि कसेही वाहणाऱ्या सांडपाण्याला दिशा दिली आहे. हे काम कोणत्याही सरकारी यंत्रणेने केलेले नाही. हे काम प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी (ईएसइइइडी) केले आहे. आपण आर्किटेक्‍ट म्हणून मोठमोठी घरे, अपार्टमेंट, बंगले , कारखाने उभे करतो पण सामाजिक बांधिलकी म्हणून या राघूच्या धनगरवाड्यातील घरांना आपण सुंदर आकार का द्यायला नको, या भावनेने त्यांनी हे काम केले आहे. ही सारी मंडळी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात व्यग्र आहेत. स्थिर आहेत. नावलौकिक मिळवला आहे. पण आपण स्थिर आहोत मग इतरांनाही स्थिर होण्यासाठी आपण मदत का करू नये, ही या सर्वांची भावना आहे. आणि या भावनेतूनच त्यांनी राघूच्या धनगर वाड्याचे सारे रुपडे बदलले आहे. 

सांडपाणी विल्हेवाट आणि प्रकाशही 
उपक्रमात दोनशेहून अधिक आजी माजी विद्यार्थी त्यांना जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देत सहभागी झाले. त्यांनी गावात शोषखड्डे काढले. सांडपाणी या शोष खड्ड्यात वळवले. जे सांडपाणी उघड्यावरुन वाहत होते त्याला नळ घातले. ज्या घरात अंधार होता, 
त्या घरावरील कौलात काचेची तीन-चार कौले बसवली. त्यामुळे अंधाऱ्या घरात प्रकाश झिरपू लागला. 

शाळा, अंगणवाडीही केली सुंदर 
खडकाळ, उंच-सखल रस्ता जेसीबीच्या साह्याने व्यवस्थित करून घेतला व सर्व घराच्या भिंती या विद्यार्थ्यांनी रंगवल्या. त्यावर साधी सुंदर पारंपारिक रचनेची नक्षी काढली. त्यामुळे निसर्गाच्या कुशीतली ही घरे अधिकच सुंदर दिसू लागली. शाळा, अंगणवाडीची इमारतही रंगवली. तेथे खेळणी बसवली. मुलांना बैठकीसाठी चांगली व्यवस्था केली. 

कुपनलिका पुन्हा खोदणार 
पाण्यासाठी दोन कूपनलिका खोदण्याचा प्रयत्न केला. पण पाणी लागले नाही, पण त्यामुळे ते थांबले नाहीत. जेथे पाणी लागण्याची शक्‍यता आहे, तेथे या गावासाठी कुपनलिका खोदून देण्याचा त्यांचा मानस आहे. 

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग आर्किटेक्‍ट कॉलेजचे आजी-माजी विद्यार्थी दरवर्षी एकत्र येतो. समारंभ करतो. जल्लोष ही करतो. पण काहीतरी वेगळे करायचे हे ठरवले. व यावर्षी शाहुवाडी आणि शिराळा तालुक्‍याच्या टोकाला असलेल्या 
राघूच्या धनगरवाड्याचे आमच्या ऐपती प्रमाणे रुपडे बदलण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात त्यामुळे सगळेच चित्र बदलले आहे असे नाही. अजूनही या धनगरवाड्यातील बायाबापड्याच्या समोर अनेक प्रश्न आहेत. आम्ही सर्व आर्किटेक्‍ट मदत करीत राहू. 
- सुरत जाधव. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com