मुंबईतून अनेक तरूण दुचाकीवरून गावच्या दिशेने... 

सुनील कोंडुसकर
मंगळवार, 24 मार्च 2020

एसटी महामंडळाच्या तसेच खासगी आराम गाड्या बंद, तर शहरातील भोडोत्री गाडी चालकांचा वाहतुकीस थेट नकार असल्याने गावाकडे येऊ इच्छिणाऱ्या मुंबईस्थित अनेक तरुणांनी थेट दुचाकीचा पर्याय निवडला. आज दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीला कीक मारून अनेकजण अंतर कापत आहेत. परंतु महामार्गावरील वाहतुकीबाबत प्रशासनाकडून घेण्यात येत असलेले निर्णय, काही शहरांनी आपल्या हद्दीत प्रवेश बंद केल्याने हे दुचाकीस्वार सुरक्षितपणे गावाकडे पोहचणार का? याची नातेवाईकांना चिंता लागली आहे. 

चंदगड : एसटी महामंडळाच्या तसेच खासगी आराम गाड्या बंद, तर शहरातील भोडोत्री गाडी चालकांचा वाहतुकीस थेट नकार असल्याने गावाकडे येऊ इच्छिणाऱ्या मुंबईस्थित अनेक तरुणांनी थेट दुचाकीचा पर्याय निवडला. आज दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीला कीक मारून अनेकजण अंतर कापत आहेत. परंतु महामार्गावरील वाहतुकीबाबत प्रशासनाकडून घेण्यात येत असलेले निर्णय, काही शहरांनी आपल्या हद्दीत प्रवेश बंद केल्याने हे दुचाकीस्वार सुरक्षितपणे गावाकडे पोहचणार का? याची नातेवाईकांना चिंता लागली आहे. 

चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातील गावागावातील नागरीक मोठ्या संख्येने रोजगारासाठी मुंबईत स्थाईक झाले आहेत. अनेकजण कुटुंबासह राहतात तर अविवाहीत तरुण आणि एकट्याने राहणारे ग्रामविकास मंडळाच्या खोलीत राहतात. ते ज्या ठिकाणी काम करतात त्या कंपनीज किंवा व्यावसायिकांनी सुरवातीचे काही दिवस काम बंद ठेवण्याबाबत ठोस निर्णय घेतला नव्हता. आज मुंबईत नव्याने पंधरा कोरोना संशयीत सापडल्याने मात्र सर्वांनीच 31 तारखेपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

जे कुटुंबासह राहतात त्यांना फारशी अडचण नाही. परंतु ग्रामविकास मंडळाच्या खोलीत राहणाऱ्यांना जेवणा-खाण्याची सोय कठिण बनली. चहाची टपरी, उपहारगृहे, खानावळ सुध्दा बंद राहिल्याने गावाकडे परतण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. परंतु जायचे कसे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्‍न उभा राहिला. एसटी महामंडळ तसेच खासगी आराम गाड्या दोन दिवसापूर्वीच बंद झाल्या आहेत. शहरात भाडोत्री प्रवाशी वाहतुक करणाऱ्या गाड्यांच्या चालकांनी कोरोनाच्या भितीने वाहतुकीस थेट नकार दिल्यामुळे एकमेव पर्याय म्हणून अनेकांनी दुचाकीची निवड केली. 

नातेवाईक धास्तावले 
गावाकडे येणारा आणखी एखादा सहकारी निश्‍चित करून एकमेकाच्या आधाराने त्यांनी आज दुपारी बाराच्या सुमारास किक मारली आहे. गावाकडे नातेवाईकांना तशी त्यांनी सुचना दिली आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतुकीवर येणारा ताण, त्यासंदर्भात प्रशासनाकडून घेतले जाणारे निर्णय, काही शहरांनी आपल्या हद्दीतून केलेली प्रवेश बंदी या सर्व वृत्तांमुळे नातेवाईक धास्तावले आहेत. आपली मुले कधी एकदा सुखरुपपणे गावाकडे पोहचतील याची त्यांना आस लागली आहे. सुमारे पाचशे किलो मीटरचा दीर्घ प्रवास करताना त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी नातेवाईक प्रार्थना करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youngers towards the village From Mumbai... Kolhapur Marathi News