हृदयद्रावक : वर्षभरापूर्वीच मुलीला अन् आता एकुलत्या एक मुलाला गमावलेल्या आई वडिलांचा आक्रोश

youth dead in hospital before the operation in belgaum mistake of administration of hospital
youth dead in hospital before the operation in belgaum mistake of administration of hospital

खानापूर : उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या जमावाने चुकीचे उपचार केल्याचा आरोप करत रुग्णालयावर हल्ला करून प्रचंड मोडतोड केल्याची घटना येथील वर्दे कॉलनीत घडली. खानापूर पोलिसात याप्रकरणी डॉ. रायन्नावर यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. रुग्णालयावर हल्ला करणाऱ्या जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. सूरज शंकर गावडे (वय १६, रा. मोदेकोप) असे उपचार सुरू असताना मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, सूरज याला सोमवारी वर्दे कॉलनीतील डॉ. रायन्नावर यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर अपेंडिक्‍सची शस्त्रक्रिया केली जाणार होती; पण सोमवारी त्याला देण्यात आलेल्या गुंगीच्या इंजेक्‍शनचा परिणाम न झाल्याने त्याला डॉक्‍टरांनी घरी पाठविले.

मंगळवारी पुन्हा त्याला बोलावले होते. सकाळी त्याची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्यासाठी गुंगीचे इंजेक्‍शन देण्यात आले. काही वेळातच त्याला रक्ताच्या उलट्या होऊन त्याची शुद्ध हरपली. डॉ. रायन्नावर यांनी सूरजला त्या स्थितीत बेळगावला घेऊन जाण्याची सूचना त्याच्या कुटुंबीयांना केली. कुटुंबीयांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, तो मृत झाल्याचे तेथील डॉक्‍टरांनी सांगितले.

कुटुंबीयांनी मृतदेह डॉ. रायन्नावर यांच्या रुग्णालयात आणून त्यांना जाब विचारला असता त्यांनी तेथून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला. जमलेल्यांमधील काही तरुणांनी रुग्णालयाच्या इमारतीवर दगडफेक करत साहित्याची नासधूस केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. यावेळी मृताच्या कुटुंबीयांसह संतप्त जमावाने संबंधित डॉक्‍टरवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली.

अटक झाल्याशिवाय मृतदेह रुग्णालयासमोरून हलवणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

एकुलता मुलगा गमावला

शंकर गावडे यांचा सूरज हा एकुलता मुलगा. त्यांच्या एका मुलीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. त्यातच आता एकुलत्या मुलग्याचाही अंत झाला. रुग्णालयासमोर मृताच्या कुटुंबीयांनी आक्रोश चालविला होता. मोदेकोप्प गावातील होतकरू तरुण म्हणून तो परिचित होता. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी समजताच अख्खा गाव रुग्णालयासमोर जमा झाला होता. सूरजच्या मागे आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com