सोलापूर शहरात 105 धोकादायक इमारती (VIDEO)

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 30 मे 2020

महापालिकेत आपत्कालीन पथक 
आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यावर, तातडीने बचाव करण्यासाठी महापालिकेत बचाव पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक 24 तास कार्यरत राहणार आहे. त्यामध्ये एक डंपर, चालकासह बिगारी, जेसीबी यंत्राची सोय आहे. आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यावर नागरिकांनी नगर अभियंता, भांडार- 2740335 किंवा 24 तास कार्यरत असणाऱ्या 1913 या तक्रार निवारण केंद्रावर संपर्क साधावा. 
 

सोलापूर :  पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील 105 धोकादायक इमारतींमधील मिळकतदारांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांनी पर्याय शोधावा, तर धोकादायक इमारतींचे मजबुतीकरण करून घ्यावे, असे नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान, मिळकतदाराने स्वतःहून धोकादायक पाडकाम करून न घेतल्यास खासगी मक्तेदारामार्फत ते पाडले जाणार आहे, अशी माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. 

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याचे प्रमाण मोठे असते. खबरदारीचा उपाय म्हणून मनपाकडून यासंदर्भात नोटिसा बजाविल्या जातात. शासन निर्णयानुसार धोकादायक इमारतींसंदर्भात संबंधित पोलिस ठाण्यांना मनपाकडून माहिती दिली जात आहे. पोलिस खात्याकडून त्या त्या हद्दीतील धोकादायक इमारतींच्या मालकांना आवश्‍यक दुरुस्तीसंदर्भात सूचना दिली जात आहे. नोटिशीला प्रतिसाद न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

महापालिका क्षेत्रातील सर्व इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे. त्यामध्ये धोकादायक व अतिधोकादायक इमारती आढळल्यास, त्यातील रहिवाशांना बाहेर काढा आणि त्या इमारती जमीनदोस्त करा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने यापूर्वी वारंवार आवाहन केले. मात्र, नागरिकांकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासंदर्भातील आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

शहराच्या दक्षिण व उत्तर कसबा, पूर्व आणि पश्‍चिम मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, गोल्डफिंच पेठ या प्रमुख वस्त्यांसह गावठाण भागात धोकादायक इमारतींची संख्या अधिक असल्याची माहिती बांधकाम विभागातून देण्यात आली. धोकादायक इमारती दुरुस्त कराव्यात किंवा पाडाव्यात, यासाठी पालिकेकडून प्रसिद्धीकरण दिले जाते. मिळकतदारांना नोटिसाही जातात; पण त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पावसाळा संपला की पालिकेची कार्यवाहीसुद्धा पुढील पावसाळा येईपर्यंत थांबते. बहुतांश इमारतींतील भाडेकरू आणि मालकांमध्ये वाद आहे. काहींची प्रकरणे न्यायालयात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन म्हणून फक्त नोटीस देऊ शकते. एखादी इमारत फारच धोकादायक झाली असेल तर पालिकेच्या असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून ती पाडता येते. 

पावसाळ्यातील काही प्रमुख दुर्घटना 
2003 : बुधले गल्लीत दगड-मातीच्या घराचा कठडा कोसळला 
2004 : बाळीवेस परिसरा दुमजली इमारतीचा ढाचा कोसळला 
2005 : सराफ कट्ट्यातील दुकानाचा कठडा कोसळून एक ठार
2006  :  इमारतीचा काही भाग कोसळला 
2007 : चंडक बगीचा येथील इमारतीचा जिना कोसळला, 
           सिद्धेश्‍वर पेठेत घर कोसळून दोन ठार, दोन जखमी 

एकूण धोकादायक इमारती : 232 
मजबुतीकरण केलेल्या इमारती : 60 
नवीन बांधकाम सुरू :  09 
महापालिकेने पाडलेल्या इमारती  : 35 
स्वतःहून पाडून घेतलेल्या इमारती  : 16 
मालक व भाडेकरू वाद : 07 
उर्वरित धोकादायक इमारती : 105 
 
महापालिकेत आपत्कालीन पथक 
आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यावर, तातडीने बचाव करण्यासाठी महापालिकेत बचाव पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक 24 तास कार्यरत राहणार आहे. त्यामध्ये एक डंपर, चालकासह बिगारी, जेसीबी यंत्राची सोय आहे. आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यावर नागरिकांनी नगर अभियंता, भांडार- 2740335 किंवा 24 तास कार्यरत असणाऱ्या 1913 या तक्रार निवारण केंद्रावर संपर्क साधावा. 
 

 सोलापूर शहरात 105 धोकादायक इमारती (VIDEO)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 105 dangerous buildings in Solapur city