सोलापूर ग्रामीणमध्ये 14 जणांचा मृत्यू, नवे कोरोनाबाधित 415, माळशिरसमध्ये सर्वाधिक रुग्ण 

प्रमोद बोडके
Wednesday, 16 September 2020

माळशिरस, पंढरपूर, हॉटस्पॉट 
आज नव्याने आढळलेल्या 415 बाधितांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 290 तर नागरी भागातील 125 रुग्णांचा समावेश आहे. आज सर्वाधिक 116 रुग्ण एकट्या माळशिरस तालुक्‍याच्या ग्रामीण भागात आढळले आहेत. बार्शी तालुक्‍यात 59, पंढरपूर तालुक्‍यात 72 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण माळशिरस तालुक्‍यात असून माळशिरस तालुक्‍यात 1 हजार 167 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल पंढरपूर तालुक्‍यात 1 हजार 91 रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यात असून दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 67 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत पाहणाऱ्या व्यक्तींचे सुरू असलेले सत्र काही केल्या थांबत नाही. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल चौदा जणांचा करणामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री बारापर्यंत कोरोना चाचणीचे 3 हजार 162 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 747 अहवाल निगेटिव्ह आले असून 415 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत ग्रामीण भागातील 415 नव्या रुग्णांची भर पडली असून सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 18 हजार 748 झाली आहे. ग्रामीण भागातील 531 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. रुग्णालयात सध्या 6 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू असून 11 हजार 838 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 234 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 103 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. 

आजच्या अहवालातील मृत व्यक्तींमध्ये करमाळा तालुक्‍यातील केम येथील 76 वर्षीय महिला. पंढरपुरातील रोहिदास चौकातील 35 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील बोरगाव येथील 58 वर्षीय पुरुष, पंढरपूर येथील संत पेठ मधील 69 वर्षिय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील खेड येथील 70 वर्षिय पुरुष, बार्शीतील शिवाजीनगर येथील 77 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील देवडे येथील 60 वर्षीय महिला, बार्शी तालुक्‍यातील जामगाव येथील 55 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दोड्डी येथील 55 वर्षीय महिला, सांगोला तालुक्‍यातील चिंचोली येथील 65 वर्षिय पुरुष, मंगळवेढा तालुक्‍यातील गारनिकी येथील 70 वर्षिय महिला, माळशिरस तालुक्‍यातील बोरगाव येथील 50 वर्षीय महिला, माढ्यातील राजरतननगर येथील 55 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील रोपळे येथील 55 वर्षिय पुरुष अशा 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 deaths in rural Solapur, 415 newly infected in Corona, highest number in Malshiras