"अतिवृष्टी'त 16 जणांचा मृत्यू, तीन जण बेपत्ता, सोलापूर जिल्ह्यातील 1 लाख 45 हजार हेक्‍टरचे नुकसान 

प्रमोद बोडके
Sunday, 18 October 2020

तालुकानिहाय नुकसान झालेली शेती हेक्‍टरमध्ये 
उत्तर सोलापूर : 11 हजार 582, बार्शी : 25 हजार 230, दक्षिण सोलापूर : 21 हजार 951, अक्कलकोट : 11 हजार 855, माढा : 6 हजार 130, करमाळा : 10 हजार 303, पंढरपूर : 28 हजार 921, मोहोळ : 14 हजार 766, मंगळवेढा : 6 हजार 572, सांगोला : 14 हजार 46, माळशिरस : 5 हजार 731, एकूण : 1 लाख 45 हजार 233 हेक्‍टर. 
(प्रत्यक्ष पंचनाम्यामध्ये नुकसानग्रस्त क्षेत्रात बदल होऊ शकतो) 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्यांना आलेल्या महापुरामुळे 16 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण अद्यापही बेपत्ता आहेत. अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 45 हजार 233 हेक्‍टरवरील ऊस, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, डाळिंब, कांदा, तूर, भुईमूग, बाजरी, ज्वारी, द्राक्ष, मका, उडीद, चारापिके, सूर्यफूल, पपई, केळी, कलिंगड यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. 

अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील 214 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. जिल्ह्यातील आठ हजार सहाशे आठ कुटुंबांमधील 32 हजार 521 जणांचे स्थलांतर करण्यात आले होते. उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस या तालुक्‍यांमध्ये 15 ऑक्‍टोबरला 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 13 ऑक्‍टोबरला सोलापूर जिल्ह्यातील 4 तर 14 ऑक्‍टोबरला सोलापूर जिल्ह्यातील 75 महसूल मंडळा अतिवृष्टी झाली आहे.

जिल्ह्यात असलेल्या एकूण 94 महसूल मंडळांपैकी 79 महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 48 घरांची पूर्णता पडझड झाली आहे. 2 हजार 208 घरांची अंशतः पडझड झाली आहे. अतिवृष्टी व महापुरात 8 हजार 661 पशुधन मृत पावले आहे. त्यामध्ये 681 मोठी जनावरे, 148 लहान जनावरे तर 7 हजार 832 पक्षांचा अशा एकूण 8 हजार 661 पशुधनाचे नुकसान झाले आहे पशुधनाचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 killed, three missing in heavy rains, 1 lakh 45 thousand hectares damaged in Solapur district