पंढरपुरात 24 तासांसाठी संचारबंदी; एसटी प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्याचा निर्णय 

भारत नागणे 
Thursday, 5 November 2020

पंढरपूर (सोलापूर) : मराठा समाजाने पुकारलेल्या पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चाचा राज्य सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मोर्चासाठी शहरात गर्दी जमू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने 24 तासांसाठी विठ्ठल मंदिर, चौफाळा आणि महाद्वार या भागात संचारबंदी लागू केली आहे. शिवाय आजपासून पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि पंढरपूरकडे होणारी एसटीची प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी (ता. 7) पासून पंढरपूर ते मंत्रालय असा राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. 

या मोर्चादरम्यान शहरात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्‍यता असल्याचे कारण पुढे करत जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी (ता. 6) रात्री 12 पासून शनिवारी (ता. 7) रात्री 12 वाजेपर्यंत विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर, नामदेव पायरी, महाद्वार, चौफाळा आदी भागांत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी काळात शहरातून दोन व त्यापेक्षा अधिक लोकांना फिरण्यासही बंदी घातली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने आदेश काढला आहे. 

मराठा समाजाचा मोर्चा हाणून पाडण्यासाठीच प्रशासनाने एसटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवून संचारबंदी लागू केली असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे सुनील नागणे (तुळजापूर) आणि रामभाऊ गायकवाड यांनी केला आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 hour curfew in Pandharpur; Decision to keep ST passenger traffic closed