जिल्ह्यातील 2390 पैकी 2374 शाळांमध्ये 92 हजार विद्यार्थ्यांची हजेरी ! 24 शिक्षक पॉझिटिव्ह 

हुकूम मुलाणी 
Wednesday, 27 January 2021

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून (बुधवारी) सुरू झाल्या. शहरातील 293 पैकी 277 शाळा सुरू झाल्या असून ग्रामीण भागातील सर्वच तालुक्‍यांमधील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तीन लाख एक हजार 533 पैकी 92 हजार 169 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. 

सोलापूर : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून (बुधवारी) सुरू झाल्या. शहरातील 293 पैकी 277 शाळा सुरू झाल्या असून ग्रामीण भागातील सर्वच तालुक्‍यांमधील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तीन लाख एक हजार 533 पैकी 92 हजार 169 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. 

अक्‍कलकोट तालुक्‍यातील 300, बार्शी व करमाळ्यातील प्रत्येकी 181 शाळा सुरू झाल्या आहेत. माळशिरसमधील 252, मंगळवेढ्यातील 117, मोहोळ तालुक्‍यातील 145, पंढरपूर तालुक्‍यातील 194, सांगोल्यातील 162, उत्तर सोलापुरातील 168 आणि दक्षिण सोलापुरातील 193 शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रजासत्ताक दिनी गृहभेटीच्या माध्यमातून काही शिक्षकांनी पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले होते. 

आज शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी काही शाळांना भेटी देऊन नियमांचे पालन होते का, याची पाहणी केली. जिल्ह्यातील आठ हजार 458 शिक्षकांपैकी आठ हजार 384 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी पाच हजार 490 शिक्षकांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात 24 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना आता 14 दिवस तथा कोरोनातून बरे होईपर्यंत पगारी रजा दिली जाणार आहे. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या मदतीने पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांत 100 टक्‍के शाळा सुरू होतील आणि 80 टक्‍क्‍यांपर्यंत विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, असा विश्‍वास शिक्षणाधिकारी श्री. राठोड यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला. 

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील दोन हजार 390 पैकी दोन हजार 374 शाळा पहिल्याच दिवशी सुरू 
  • शहरातील सहा शाळा वगळता सर्वच तालुक्‍यांमधील शाळांनी उघडले कुलूप 
  • तीन लाखांपैकी 92 हजार 169 विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेत नोंदविली हजेरी 
  • माळशिरस पाच, मंगळवेढा, मोहोळमधील प्रत्येकी दोन, सांगोल्यातील चार तर उत्तर व दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह 
  • दोन हजार 201 शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी वापरले थर्मल स्क्रिनिंग व ऑक्‍सिमीटर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 teachers in the district have been found to be corona positive