दिलासादायक...सोलापुरातील सिंहगड कोविड केंद्रातील 31 रुग्ण कोरोनामुक्त

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 21 मे 2020

40 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्टर  व नर्स इतर स्टाफ ची कमतरता होती. त्या अनुषंगाने आज ४० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.

सोलापूर : शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील वाडिया हॅास्पिटलमध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. दरम्यान, सिंहगड कोविड केंद्रातून आजअखेर 31 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचेही आयुक्तांनी सांगितले. 

श्री. तावरे म्हणाले, सोलापूर शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या सिव्हिल हॉस्पिटल, ई एस आय हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल, लोकमंगल हॉस्पिटल, अश्विनी हॅास्पिटल कुंभारी येथे उपचार केले जात आहेत. वाढती रुग्णांची संख्या पाहता वाडिया हॉस्पिटल येथे उपचार सुरू करता येतील का याबाबत आज कोविड विभागाचे प्रमुख डॅा. प्रसाद व महापालिकेचे आरोग्याधिकारी डॅा. संतोष नवले यांच्यासमवेत वाडीया हॅास्पिटलची पाहणी केली. या ठिकाणी जवळपास 125 रुग्णांची सोय होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. थोड्या दिवसातच  वाडिया हॉस्पिटल येथे कोविड19 साठी सोलापूरकरांना उपलब्ध करून देण्यात येईल. 

श्री. तावरे म्हणाले, महापालिकेने 11 मे रोजी सिंहगड केगांव येथील इन्स्टिट्यूटमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्यामध्ये आत्तापर्यंत 142 पॉझिटिव्ह रुग्ण तेथे उपचार घेत  आहेत. आतापर्यंत या केंद्रातील 31 रुग्ण बरे होऊन ते घरी परतले आहेत. हे कोविड सेंटर महापालिकेचे डॉक्टर श्रीमती शिरशेट्टी, डॅाक्टर मुलाणी यांच्या यांच्या देखरेखीखाली आहे. त्यामध्ये आर. सी. एच. वाय. डॉक्टरांचाही सहभाग आहे. रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर येथील केंद्र भविष्यातही सुरु ठेवण्यात येणार आहे.

40 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्टर  व नर्स इतर स्टाफ ची कमतरता होती. त्या अनुषंगाने आज ४० डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. सगळे डॉक्टर कोविड19च्या कामकाज पाहतील, असेही आयुक्तांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 31 patients from Sinhagad Kovid Center in Solapur released from corona