बोरामणी विमानतळासाठी 350 कोटींचा प्रस्ताव

तात्या लांडगे
Thursday, 10 December 2020

भूसंपादनानंतर पुढील कामांचे नियोजन 
बोरामणी येथील प्रास्तावित विमानतळासाठी संपादन करावयाच्या 29 हेक्‍टर जमिनीसाठी राज्य सरकारकडून 40 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आता ते क्षेत्र संपादित करुन पुढील कामांचे नियोजन होईल. 
- अनिल पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई 

सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळ सुरळीत होण्यासाठी श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीसह अन्य अडथळ्यांची शर्यत अद्याप संपलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर आता काही वर्षांत बोरामणी विमानतळ सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या 29 हेक्‍टर जमिनीच्या संपादनासाठी राज्य सरकारने 40 कोटींचा निधी दिला आहे. त्यानंतर पुढील टप्प्यातील कामांसाठी 350 कोटींचा निधी लागणार असून तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडियाकडे पाठविला जाणार आहे.

 

एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडियातर्फे नियोजन 
बोरामणी विमानतळासाठी आतापर्यंत एक हजार 570 एकरहून अधिक जमिनीचे संपादन केले आहे. आता उर्वरित जमिनीचे संपादन पूर्ण होईपर्यंत नागपूर वन कार्यालयाकडून वन विभागाच्या जमिनीचाही प्रश्‍न सोडविला जाणार आहे. त्यानंतर एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील कामे केली जाणार आहेत. पहिल्यांदा सर्व परिसर लेव्हल करुन वॉल कंपाउंड मारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कामे एअरपोर्ट ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहेत.

 

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण आणि एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बोरामणी विमानतळाचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. कोरोनाच्या संकट काळातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बोरामणी विमानतळाच्या भूसंपादनाचा विषय निधीच्या माध्यमातून सोडविला आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर संपादित जमिनीचे लेव्हलिंग, वॉल कंपाउंड, टर्मिनल बिल्डींगची कामे केली जाणार आहेत. तर प्रारंभी एकच रन-वे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांसाठी लागणारा निधी 50 टक्‍के एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडिया आणि 50 टक्‍के निधी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे केला जाणार असल्याचे प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

भूसंपादनानंतर पुढील कामांचे नियोजन 
बोरामणी येथील प्रास्तावित विमानतळासाठी संपादन करावयाच्या 29 हेक्‍टर जमिनीसाठी राज्य सरकारकडून 40 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आता ते क्षेत्र संपादित करुन पुढील कामांचे नियोजन होईल. 
- अनिल पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 350 crore proposal for Boramani Airport