esakal | महापौरांच्या दालनात गुपचूप झाली सभा ! गटनेत्यांशिवाय 37 कोटींच्या विषयांना मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

SMC

कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांची कोरोना टेस्ट करून सभा घेण्याची मागणी केली. मात्र, महापौरांनी पोलिस बळाचा वापर करून त्यांच्या दालनात सभा उरकून 37 कोटी रुपयांचे विषय मंजूर करून घेतल्याचा आरोप या गटनेत्यांनी केला आहे. 

महापौरांच्या दालनात गुपचूप झाली सभा ! गटनेत्यांशिवाय 37 कोटींच्या विषयांना मंजुरी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांची कोरोना टेस्ट करून सभा घेण्याची मागणी केली. मात्र, महापौरांनी पोलिस बळाचा वापर करून त्यांच्या दालनात सभा उरकून 37 कोटी रुपयांचे विषय मंजूर करून घेतल्याचा आरोप या गटनेत्यांनी केला आहे. 

कोरोनाच्या नावाखाली मान्यतेशिवाय केलेला भरमसाठ खर्च, उजनी धरण, औज व हिप्परगा तलाव भरल्यानंतरही शहराला चार ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातोय आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शहरवासीयांना मदत द्यावी, या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी गटनेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेला विरोध केला. तरीही ऑनलाइन सभा घेण्यात आली असून, त्याला 20 देखील नगरसेवक उपस्थित नव्हते, असा आरोप विरोधकांनी केला आहे. 

दरम्यान, शहरातील नागरिकांना एक दिवसाआड तथा दररोज पाणी देण्याचे आश्‍वासन देऊनही सत्ताधाऱ्यांनी त्याची पूर्तता केलेली नाही. हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावरून राजकारण करत असताना भाजप सत्ताधाऱ्यांनी नवरात्र महोत्सवात नागरिकांना वेळेवर नियमित पाणी दिले नाही. त्यामुळे अनेकांनी घरातील दसराही काढला नाही, असा आरोप नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला. तर स्थायी समितीच्या सभागृहात ऑनलाइन सभा घेण्याचे नियोजन असल्याने सर्व गटनेते त्या ठिकाणी ठाण मांडून होते. त्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आमच्या पार्टीच्या नेत्यांशी व सभागृह नेत्यांशी चर्चा करून सभा घेऊ, असे म्हणून त्यांनी अँटिचेंबरमध्ये सभा उरकली, असा आरोप एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी केला. याबाबत महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही. 

शनिवारी गटनेत्यांची बैठक 
महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येवरून विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी होणार आहेत. त्यासंदर्भातील विषय आज (मंगळवारी) होणाऱ्या सभेत घेतला जाणार असून, ही सभाही ऑनलाइन होणार आहे. त्यानंतर सभा तहकूब केली जाणार असून एक महिन्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. तत्पूर्वी, शनिवारी (ता. 24) विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. 

आमदार देशमुखांनी सांगूनही पाणीपुरवठा विस्कळित 
नवरात्र महोत्सवात शहरवासीयांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा, यासंदर्भात आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्‍तांसह महापौरांसोबत काही दिवसांपूर्वी तातडीची बैठक घेतली. त्यानंतर काही दिवस दोन दिवसांआड पाणी मिळेल, असा विश्‍वास होता. मात्र, चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता पाच ते सहा दिवसांआड झाल्याने नेमकी बैठक कशासाठी घेतली, असा प्रश्‍न विरोधकांनी विचारला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल