500 मेंढ्या मारताहेत जुळे सोलापुरातील गवतावर ताव ! कळपासह 25 मेंढपाळांचा लवाजमा

jule solapur
jule solapur

सोलापूर : सततच्या पावसामुळे जुळे सोलापूर परिसरातील अनेक मोकळ्या जागा सध्या गवताने व्यापल्या आहेत. या हिरव्यागार गवतावर ताव मारण्यासाठी थेट विजयपूरहून 500 मेंढ्या दाखल झाल्या आहेत. 

हद्दवाढीनंतर विस्तारलेल्या जुळे सोलापूर परिसरात लोकवस्ती वाढत असतानाच अनेक मोकळ्या जागाही शिल्लक आहेत. या मोकळ्या जागावर सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवताची वाढ झाली आहे. हिरव्यागार गवतामुळे जनावरे याकडे आकर्षित होऊन त्याचे त्यांनी कुरणच केले आहे. आता जनावरांसह थेट विजयपूर जिल्ह्यातून भटकंती करत आलेले मेंढपाळ दाखल झाल्याने त्यांच्या कळपातील सुमारे 500 मेंढ्यांचा या गवतावर निर्वाह सुरू आहे. वाढलेले तण मेढ्यांच्या खाण्याने संपून अडचण कमी होत असल्याने या मेंढपाळांना कोणाचाही विरोध होत नाही. उलट सहकार्यच केले जात आहे. 

गावाकडे चाऱ्याची टंचाई असल्याने दिवाळीनंतर भटकंतीसाठी बाहेर पडलेले विजयपूर जिल्ह्यातील अलकेरी, आलीबादी या गावांच्या परिसरातील सुमारे 25 मेंढपाळ आपापल्या लवाजम्यासह सुमारे 500 मेंढ्यांचा कळप घेऊन गेल्या 15 दिवसांपासून जुळे सोलापुरात वास्तव्यास आहेत. या परिसरात मेंढ्यांसह फिरणारे मेंढपाळ या उच्चभ्रू वस्तीतील लहान मुलांसाठी आकर्षण ठरत आहेत. 

'आमच्या रानात जनावरे चारायला का आमचे शेत म्हणजे कुरण वाटलं का?' अशी वाक्‍ये खेडेगावच्या शेतशिवारात सर्रास ऐकायला मिळतात. मात्र जुळे सोलापुरातील मोकळ्या जागेत वाढलेलं गवत 500 मेंढ्यांचे कळप फस्त करत असताना त्यांना कोणीही हटकत नसल्याने हे मेंढपाळ बिनधास्तपणे मेढ्यांना गवतात सोडत आहेत. हे सर्व मेंढपाळ वेगवेगळ्या ठिकाणी 50-100 मेढ्यांच्या कळपासह फिरत आहेत. बावसू माने, मल्हारी गाढवे, गेनबा सूळ यासह अन्य सुमारे 20 ते 25 जण कुटुंबक बिल्यासह भटकंती करत आहेत. 

आलीबादी (ता. जि. विजयपूर) येथील मेंढपाळ बावसू माने म्हणाले, गावाकडे चाराटंचाई असल्याने दिवाळीनंतर आम्ही गाव सोडून बाहेर पडलो. विजयपूरहून अफजलपूर, गुलबर्गा, अक्कलकोटसह जिल्ह्यातील अनेक गावांतून फिरलो. आता परत गावाकडे निघालो आहोत. ज्या परिसरात गवत व चारा उपलब्ध असतो तेथे आमचा मुक्काम वाढतो. त्यानंतर पुढच्या मुक्कामाला. असे करत आता गावी जाणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com