सोलापुरातून अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठीचे 5221 अर्ज प्रलंबित 

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 21 June 2020

नऊ ट्रेनमधून 10 हजार जण रवाना 
सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील व्यक्तींना नऊ विशेष रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी येथून तमिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल या राज्यात विशेष ट्रेन पाठवून 10 हजार 834 जणांना रवाना करण्यात आले आहे. 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारच्यावतीने जाहीर केलेल्या लॉकडाउनमध्ये सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या इतर जिल्ह्यांतील व्यक्तींना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पास दिले जात आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक हजार 794 आणि पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन हजार 427 असे एकूण पाच हजार 221 अर्ज प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यांत जाण्यासाठी आतापर्यंत एक लाख 46 हजार 531 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक लाख 41 हजार 310 व्यक्तींना त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले आहे. 

निवारा केंद्रातील एकही व्यक्ती सध्या जिल्ह्यात शिल्लक नाही. सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी 40 हजार 43 व्यक्तींनी अर्ज केले होते. त्यापैकी 39 हजार 762 व्यक्तींना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातून इतर राज्यांत जाण्यासाठी अर्ज केलेल्या 311 जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामध्ये पोलिस आयुक्तालय हद्दीतील 147 तर पोलिस अधीक्षक हद्दीतील 164 व्यक्तींचा समावेश आहे. लॉकडाउन कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील व्यक्तींच्या निवासासाठी, भोजनासाठी निवारा केंद्र स्थापन करण्यात आले होते. या निवारा केंद्रात असलेल्या सर्वच्या सर्व तीन हजार 22 जणांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या निवारा केंद्रात महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतील 273 व्यक्ती अडकले होते. त्या सर्वांना देखील सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांच्या गावाकडे पाठविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5221 applications pending for moving from Solapur to other districts