सोलापूर जिल्ह्यातील 71 हजार 904 कामगारांना मिळाले 14 कोटी रुपये 

प्रमोद बोडके
Saturday, 20 June 2020

21 प्रकारच्या कामगारांची होते नोंदणी 
सहायक कामगार आयुक्त यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे वतीने बांधकाम क्षेत्रातील विविध 21 प्रकारच्या कामगारांची नोंदणी करण्यात येते. यात 1) दगड फोडणे, कापणे, दगडाचा बारीक चुरा करणे, 2) लादी किंवा टाइल्स कापणे व पॉलिश करणे 3) रंग, वॉर्निश लावणे, सुतार काम 4) गटार व नळ जोडणीची कामे 5) वायरिंग, वितरण, तावदान बसविणे, विद्युत कामे 6) अग्निशमन यंत्रणा व दुरुस्तीची कामे 7) वातानुकुलित यंत्रणा बसविणे व दुरुस्ती करणे 8) उदवाहने, स्वयंचलित जिने 9 ) सुरक्षा दरवाजे उपकरणे लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रिल्स, खिडक्‍या, दरवाजे तयार करणे 10) जल संचयन संरचनेचे बांधकाम 11) सुतारकाम, आभासी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पॅरिस व सजावटीची कामे 12) काच कापणे, लावणे, काचेची तावदाने बसविणे 13) सौर तावदाने व ऊर्जाक्षम उपकरणे बसविणे 14) स्वयंपाक खोलीसारख्या ठिकाणी मॉड्यूलर किचन युनिटची कामे 15) सिमेंट कॉंक्रिट वस्तू तयार करणे 16) जलतरण तलाव, गोल्फचे मैदान आदी खेळाच्या व मनोरंजनाच्या सुविधांची कामे 17) माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवासी निवारे किंवा बसस्थानके 18) सिग्नल यंत्रणा आदी उभारणे 19) रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजी बसविणे 20) सार्वजनिक उद्याने, रमणीय भूप्रदेश तयार करणे 21) विटा, छपरावरील कौल आदी तयार करणे अशा 21 क्षेत्रांतील कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यात येते. 

सोलापूर : लॉकडाउन काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांचा उदरनिवार्हाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे इमारत व अन्य बांधकाम कल्याणकारी मंडळाने त्यांच्याकडे नोंद असलेल्या तसेच नूतनीकरण केलेल्या व सक्रिय कामगारांना दोन हजार रुपयांची मदत जाहीर केली. या मदतीचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील 71 हजार 904 कामगारांना मिळाला असून त्यांच्या खात्यात 14 कोटी 38 लाख रुपये थेट जमा करण्यात आल्याची माहिती सहायक कामगार आयुक्त नीलेश येलगुंडे यांनी दिली. 

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू केले. लॉकडाउन काळात उद्योग, व्यवसाय, व्यापार, बांधकाम, वाहतूक व्यवस्था आदी बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. बांधकाम कामगारांचा प्रश्‍न पुढे येताच इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाने कामगारांना मदतीचा हात दिला आहे. कामगारांच्या कल्याणासाठी सुमारे 29 विविध कल्याणकारी योजना मंडळाकडून राबविण्यात येतात. यात कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, कामगारांचा मृत्यू झाल्यास अर्थसाहाय्य, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा 29 योजनांचा समावेश आहे. 

सोलापूर जिल्ह्यात 31 मार्चअखेर 21 क्षेत्रांतील एक लाख 14 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून 88 हजार 601 बांधकाम कामगारांचे नूतनीकरण केले आहे. या सक्रिय कामगारांच्या यादीची तपासणी करून महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आली. मुंबई येथे यादीतील कामगारांच्या बॅंक खात्याची पडताळणी करून अचूक खाते क्रमांक असलेल्या 71 हजार 904 बांधकाम कामगारांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. उर्वरित बांधकाम कामगारांचे चुकीचे बॅंक खाते क्रमांक तपासून पुन्हा दुरुस्ती करून पाठविण्यात येत असल्याचे श्री. येलगुंडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 71904 in Solapur district Fourteen crore rupees received by the workers