शेजारचे गेले दवाखान्यात ! तितक्यात महाविद्यालयीन तरुणाने चोरले 75 ग्रॅम दागिने

तात्या लांडगे 
Sunday, 15 November 2020

मोहम्मद कुरेशी हे उपचार घेऊन दोन दिवसांनी घरी परतले. त्यावेळी त्यांनी स्वत:कडील चावीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप उघडले नसल्याने त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील लाकडी दिवाण उचकटलेला दिसला. चोरट्याने लॉक तोडून दिवाणात ठेवलेल्या डब्यातील 75 ग्रॅम सोने चोरून नेल्याचे त्यांना आढळले.

सोलापूर : न्यू पाच्छा पेठेतील अफना अपार्टमेंटमधील मोहम्मद हनीफ अब्दूल हनीफ कुरेशी यांच्या घरात 10 नोव्हेंबरला चोरी झाली होती. जेलरोड पोलिसांनी चोरट्याचा 48 तासांत तपास लावून चोरी करणाऱ्या खिजर मो. जफर चौधरी या 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला जेरबंद केले.

अफना अपार्टमेंटमधील कुरेशी हे आजारी असल्याने 8 नोव्हेंबरला ते उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. मोहम्मद कुरेशी हे उपचार घेऊन दोन दिवसांनी घरी परतले. त्यावेळी त्यांनी स्वत:कडील चावीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप उघडले नसल्याने त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील लाकडी दिवाण उचकटलेला दिसला. चोरट्याने लॉक तोडून दिवाणात ठेवलेल्या डब्यातील 75 ग्रॅम सोने चोरून नेल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर त्यांनी जेलरोड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला.

शेजारील तरुणानेच ही चोरी केल्याचे उघड झाले. जेलरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, विश्‍वनाथ सिद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोलिस हवालदार शरीफ शेख, बाबा फरीद, राहूल दुधाळ, नागेशसिंह चौहान, सारंग लिगाडे, विकी राठोड, दयानंद बंगाळे, विठ्ठल यलमार, मल्लिकार्जून चमके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नोकरीच्या अमिषाने 62 हजारांची फसवणूक

सोलापूर : टाईम्स जॉबमध्ये नोंदणी करण्यासाठी नोंदणी फी शंभर रुपये भरा म्हणून समोरील व्यक्‍तीने दीपक कृष्णा रावल (रा. नवनीत अपार्टमेंट, दमाणी नगर) यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी शंभर रुपये भरले. मात्र, त्यानंतर सहावेळा 62 हजार 625 रुपये बॅंकेतून परस्पर ऑनलाइन लंपास केल्याचेही रावल यांनी फौजदार चावडी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मोबाइल क्रमांकाचा तपास सुरु केला असून अनोळखी महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 29 व 30 ऑक्‍टोबरला घडल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 75 grams of jewelery have been stolen from a house in New Pachcha Peth in Solapur