मायक्रोसॉफ्ट टिम्सच्या माध्यमातून अभिजीत पाटील करतात विद्यार्थ्यांना अध्यापन 

मायक्रोसॉफ्ट टिम्सच्या माध्यमातून अभिजीत पाटील करतात विद्यार्थ्यांना अध्यापन 

सोलापूर ः सोलापूर येथील उमाबाई श्राविका विद्यालयातील शिक्षक अभिजीत पाटील यांनी आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी सुरवातीच्या काळात व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यामध्ये त्यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे समाधान होत नव्हते. शेवटी त्यांनी त्यांच्या संस्थेच्या प्रमुखांशी चर्चा करुन शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात मायक्रोसॉफ्ट टिम्सच्या माध्यमातून अध्यापन करण्याचा निर्णय घेतला. त्याचा खूपच चांगला फायदा आजही विद्यार्थ्यांना होत असल्याने पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येतात. 

मायक्रोसॉफ्ट टिम्सच्या माध्यमातून अध्यापन केल्यामुळे विद्यार्थ्यांना रिअल टाईम इंटरॅक्‍शन, विविध ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण तसेच प्रत्यक्ष अध्ययन अनुभव या सुविधा मिळत आहेत. या ऍपवर शिक्षकांनी घेतलेला तास रेकॉर्ड करून ठेवणे शक्‍य असल्यामुळे विद्यार्थी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार तास पाहतात. आलेल्या शंका शिक्षकांना टिम्स ऍपच्या माध्यमातून प्रत्यक्ष मॅसेज करून विचारत आहेत. टिम्स ऍपमध्ये असाइनमेंट ही सुविधा असल्याने विद्यार्थी पाठाशी निगडित दिलेला रोजचा अभ्यास करुन सबमिट करत आहेत. शिक्षकांनी तपासून दिलेले रिव्ह्यू ते बघत आहेत. अध्यापन करून झालेल्या भागावर काहूत व गुगल फॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही केले आहे. विद्यालयाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांची घटक चाचणी प्रशालेने घेतली आहे. विद्यार्थ्यांना त्याचा निकालही कळवला आहे. या सर्व प्रयत्नांमुळेच प्रशालेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन तासाला जवळजवळ 100 टक्के उपस्थिती आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसले तरीही शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील गुरु व शिष्याचे नाते या ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणातून यशस्वीपणे टिकवून ठेवता आले आहेत. 

शाळेतील सर्व सहकाऱ्यांनी मार्च ते मे महिन्यांमध्ये व्हॉटसऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु व्हॉटस्‌ऍप हे प्रभावी माध्यम होत नाही असे लक्षात आल्यानंतर श्री. पाटील व त्यांचे सहकारी प्रदीप डेरे यांनी मायक्रोसॉफ्ट टिम्सच्या माध्यमातून उत्तम अध्यापन आपण करू शकतो, असे वरिष्ठांच्या व सहकारी शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार 28 मे ते 10 जून या कालावधीत सर्व सहकारी शिक्षकांना मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या माध्यमातून अध्यापन कसे करावे, आपले संगणकीकृत शैक्षणिक साहित्य तयार करणे व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे याचे प्रशिक्षणही त्यांनी दिले. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com