esakal | उपरीतील शेतकऱ्याने घेतले डाळिंबाचे भरघोस 40 टन उत्पादन ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Upari Pomegranate

उपरी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी भारत शिवाजी बागल यांना डाळिंब बागेतून भरघोस उत्पादन मिळाले आहे. सात एकर बागेतून त्यांना यावर्षी 40 टन उत्पन्न मिळाले आहे. डाळिंब बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे दर्जेदार फळांनी बाग लगडली आहे. 

उपरीतील शेतकऱ्याने घेतले डाळिंबाचे भरघोस 40 टन उत्पादन ! 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : उपरी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी भारत शिवाजी बागल यांना डाळिंब बागेतून भरघोस उत्पादन मिळाले आहे. सात एकर बागेतून त्यांना यावर्षी 40 टन उत्पन्न मिळाले आहे. डाळिंब बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे दर्जेदार फळांनी बाग लगडली आहे. 

लॉकडाउननंतर हळूहळू शेतीमालाचे दर वाढू लागले आहेत. अशातच डाळिंबाची आवक कमी झाल्याने डाळिंबाचे दरही वाढले आहेत. सध्या डाळिंबाची तोडणी सुरू झाली असून, दरही चांगला मिळाला आहे. प्रतिकिलो 145 रुपये दराने 15 टन डाळिंबाची जागेवरच विक्री केली आहे. कमी प्रतीच्या डाळिंबाला पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिकिलो 102 रुपयांचा भाव मिळाला आहे. 

भारत बागल यांनी अलीकडेच माळरान असलेली सात एकर शेती खरेदी केली होती. माळरान असलेल्या शेतीमध्ये त्यांनी भगवा डाळिंबाची लागवड केली होती. दरम्यान, सततच्या हवामान बदलामुळे तेल्या आणि मर रोगामुळे नुकसान झाले. तरीही आशा आणि हिंमत न सोडता त्यांनी विविध प्रयोग करत डाळिंब शेती सुरूच ठेवली. यावर्षी योग्य व्यवस्थापन आणि वेळोवेळी केलेल्या कीड व कीटकनाशकाच्या फवारण्या घेऊन बाग जोपासली होती. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बागेला मोठा फटका बसला, फळांची गळती झाली. आपत्ती त्यांच्यासाठी इष्टापत्ती ठरली. 

फळांची संख्या विरळ झाल्यामुळे फळांचा रंग आणि आकार मोठा झाला. अत्यंत कष्ट आणि मेहनत घेऊन डाळिंब बागेची जोपासनी केली आहे. सात एकरातून त्यांना जवळपास 40 टन उत्पादन मिळाले आहे. उच्च प्रतीच्या डाळिंबाला 145 ते 160 रुपये असा दर मिळाला आहे, तर कमी प्रतीच्या डाळिंबाला शंभरहून अधिक रुपयांचा भाव मिळाला आहे. सात एकर डाळिंब बागेसाठी त्यांना पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे. खर्च वजा जाता त्यांना 25 ते 30 लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. कमी क्षेत्रात आणि कमी खर्चात येणारी पिके घेतली तर नक्कीच भरघोस उत्पादन मिळू शकते, त्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी, असा सल्लाही श्री. बागल यांनी तरुण शेतकऱ्यांना दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल